महाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा
तर कोरोना व्हायरसने मागील 24 तासांत 3 जणांचा बळी घेतला आहे.
महाराष्ट्र पोलिसांभोवतीचा विळखा देखील जनसामान्यांप्रमाणेच आहे. आज सलग दुसर्या दिवशी महाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये 100 पेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान मागील 24 तासामध्ये 116 पोलिस कर्मचारी कोरोना बाधित झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर कोरोना व्हायरसने मागील 24 तासांत 3 जणांचा बळी घेतला आहे. राज्यात आता एकूण 2211 पोलिस कर्मचारी कोरोना व्हायरसच्या विळख्यामध्ये अडकले आहेत. तर एकूण 25 जणांची कोरोना व्हायरस विरूद्धची लढाई अयशस्वी ठरल्याने त्यांचं निधन झालं आहे. COVID 19 ने दगावलेल्या मुंबई पोलिस कर्मचार्याला कुटुंबाला मिळणार 65 लाखाची मदत.
देशामध्ये दीड लाखाच्या पार गेलेल्या कोरोना बाधितांच्या रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, औरंगाबाद, अकोला मध्ये संचारबंदी कडक ठेवण्याचं आव्हान सध्या महाराष्ट्र पोलिसांसमोर आहे. मात्र मागील 2 महिन्यांपासून दिवस रात्र काम करणार्या पोलिसांवर आता कामाचा ताण आला आहे. दरम्यान पोलिसांना काही काळ आराम देऊन त्याजागी निमलष्करी दलाचे जवान तैनात करून सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचं काम केले जात आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील 50 ते 58 वयोगटातील कर्मचाऱ्यांना सुट्टी देणार- DGP सुबोध कुमार जयस्वाल.
ANI Tweet
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा मोठा आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली आहे. दरम्यान काल रात्रीच्या आकडेवारीनुसार, 2598 नवे कोरोनाबाधित रूग्ण समोर आल्याने राज्यातील एकूण आकडा 59546 आहे. तर काल 698 जणांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे. राज्यात 18616 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात विविध ठिकाणी सध्या 38939 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून 1982 जणांचा मृत्यू झाला आहे.