Pune COVID 19 Restrictions: पुणे जिल्ह्यात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर नियम कडक; विनामास्क फिरल्यास 500 रूपये दंड ते लस न घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी
मुंबई, ठाणे पाठोपाठ आज (4 जानेवारी) पुणे (Pune) जिल्ह्यामध्येही वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी या बैठकीला हजेरी लावत काही नियम कडक केले आहेत. यामध्ये विनामास्क फिरणार्यांना, लसीचे दोन्ही डोस न घेतल्यांना आता कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांना उद्यापासून बाहेर पडताना अधिक सतर्क व्हावं लागणार आहे.
अजित पवारांनी आज केलेल्या घोषणेनुसार आता पुण्यात पहिली ते आठवी चे ऑफलाईन वर्ग बंद राहतील. ऑनलाईन वर्ग पूर्वीप्रमाणे घेतले जातील. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले आहे. याच माध्यमातून त्यांचे लसीकरण देखील पूर्ण केले जाईल असा मानस अजित पवारांनी बोलून दाखवला आहे. मात्र 18 वर्षांवरील नागरिकांना पुरेशी संधी देऊनही लस न घेणारे, विनामास्क फिरणारे यांच्यावर मात्र आता कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. पुण्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 18% झाला असून आज 1104 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत.
ANI Tweet
पुण्यामध्ये 5 जानेवारी पासून विनामास्क फिरणार्यांना 500 रूपये दंड आकारला आहे. तसेच मास्क हा कापडी डिझायनर पेक्षा थ्री प्लाय, सर्जिकल, एन 95 वापरण्याचे आवाहन केले आहे. कुणी मास्क नसताना थुंकताना दिसल्यास 1000 रुपयांचा दंड होणार आहे. तसेच पुण्यात आता ' नो वॅक्सिन नो एंट्री' चा नियम लागू होणार आहे. या अंतर्गत पुणे जिल्ह्यात मॉल, खासगी तसंच सरकारी कार्यालयात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले नसलेल्यांना प्रवेश नसेल. तर नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्याचं अजित पवार यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात कोरोना निर्बंध कडक करण्यासाठी उद्या (5 जानेवारी) दिवशी नियम कडक करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सकाळी 9 वाजता ही बैठक होईल असे अजित पवारांनी सांगितले आहे. तर लॉकडाऊन नियमांबद्दल केंद्राशी बोलणं झालं असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.