COVID-19: पुणे येथे 3 वर्षाच्या चिमुकलीला कोरोना विषाणूची लागण; आजोबांमुळे संसर्ग झाल्याची माहिती

या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांतील 500 हून अधिक लोक सहभागी झाले होते.

Coronavirus Fear| प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

देशात कोरोनाचे (Coronavirus) थैमान घातले असताना 18 मार्च रोजी दिल्लीतील (Delhi) निजामुद्दीन (Nizamuddin) परिसरातील मशिदीत एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांतील 500 हून अधिक लोक सहभागी झाले होते. पुणे (Pune) जिल्ह्यातून निजामुद्दीनला 136 तब्लिगी गेले होते. त्यापैकी 94 जण पुणे उपनगर भागातून, तर उर्वरित ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमधून होते. यातच पुणे येथे एका 3 वर्षाच्या चिमुकलीला कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे. निजामुद्दीनमधील ‘तब्लिगी जमात’च्या कार्यक्रमाहून परतलेल्या आजोबांमुळे तिला संसर्ग झाल्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी पुण्यात 7 नवे कोरोनाबाधीत रुग्ण सापडले असून, त्यापैकी 2 जण निजामुद्दीनहून परत आलेले आहेत. त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींची माहिती घेण्याचे काम पोलीस करत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी संचारबंदी घोषीत केली होती. मात्र, काही ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन केले जात असल्याचे समोर आले आहे. देशावर कोरोनाचे संकट वावरत असतानाही दिल्ली येथे निजामुद्दीन परिसरातील मशिदीत एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांपैकी काहीजणांना कोरोनाची लागण असल्याची माहिती समोर आली आहे. यातच पुणे येथे राहणाऱ्या एका 3 वर्षाच्या चिमुकलीला अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीचे आजोबा दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमाहून परतले होते, त्यांच्याकडून नातीला संसर्ग झाला आहे. आजोबांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना मंगळवारी पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे देखील वाचा- COVID-19: धारावीत आढळला कोरोनाचा आणखी एक रुग्ण; एका 35 वर्षीय डॉक्टरची टेस्ट पॉझिटिव्ह

दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात मोठ्या संख्येत लोक आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हे सर्वजण आपापल्या घरी परतले. त्यापैकी काही जणांना करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती देशातील निरनिराळ्या भागातून या ठिकाणी लोक आल्यान त्यांना युद्धपातळीवर शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आङे. दरम्यान, या कार्यक्रमात सामील झालेल्या काही जणांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. दरम्यान, दक्षिण मुंबईतील आतापर्यंत एकूण 191 परिसर सील करण्यात आले आहेत, यात मलबार हिल, वाळकेश्वर, पेडर रोड, बेलासीस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीचा समावेश आहे.