नगरसेवकांना 1 मार्चपासून कोविड-19 लस मिळणार; महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यावर BMC चे 'हे' स्पष्टीकरण

यावर पालिका अधिकाऱ्यांनी 'असे' स्पष्टीकरण दिले आहे.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील (Mumbai) सर्व नगरसेवकांना (Corporators) 1 मार्चपासून कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) मिळणार, अशी माहिती मुंबई महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी शुक्रवारी दिली होती. लोकप्रतिनिधींना कोविड-19 लस देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केल्यानंतर किशोरी पेडणेकरांनी हे वक्तव्य केले होते. परंतु,  पालिकेला अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

"मी स्वत: नोंदणी करुन नागरी समितीला लागणारी सर्व कागदपत्रं सुपूर्त केली आहेत आणि 1 मार्चपासून सर्व नगरसेवकांना कोरोना लस देण्यात येईल," अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली होती. दरम्यान, ज्या नगरसेवकांना लस मिळणार आहे ते 50 वर्षापुढील वयोगटातील आहेत, असे पालिकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (कोविड-19 जनजागृतीसाठी महापौर किशोरी पेडणेकर यांचा लोकलने प्रवास; नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन)

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 50 वर्षांहून अधिक नागरिकांना कोविड-19 लसीचे डोस देण्यात येणार आहेत. बहुतांश नगरसेवकांचे वय हे 50 वर्षांपेक्षा अधिक असल्यामुळे ते या लसीकरणासाठी पात्र ठरतील. परंतु, सर्व नगरसेवकांना लस देण्यात यावी, अशा प्रकारचे कोणतेही आदेश पालिकेला मिळालेले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Mumbai: कोरोनाचा उद्रेक! होम क्वारंटाइनबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला महत्वाचा निर्णय)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शुक्रवारी, राज्यात कोरोनाच्या 6,112 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या 20,87,632 इतकी झाली आहे. तर 44 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 51,713 इतकी झाली आहे. मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरातून कोविड-19 चे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.