Coronavirus: 'हा मूर्खपणाच नव्हे तर मस्तवालपणाही!' मरकज प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका
केवळ गुन्हे दाखल करुनच थांबू नये तर त्यांची रवानगी थेट तुरुंगात करण्यात यावी, अशी मागणीही खा. संजय राऊत यांनी या वेळी केली.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा अवघे जग सामना करत आहे. त्याचे परिणाम अवघे जग भोगत आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्या पंतप्रधानांनी देश लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना राजधानी दिल्लीत विशिष्ट समूदयाचे लोक हजारोंच्या संख्येने धार्मिक कार्यक्रमास जमतात. हा प्रकार केवळ मूर्खपणाच नव्हे तर मस्तवालपणाही आहे. तो करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया देत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निजामुद्दीन दर्गा मरकज (Nizamuddin Markaz Case Delhi) प्रकरणावर टीका केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत हे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील मशिदी बंद आहेत. मक्का येथीलही मशिद बंद ठेवण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर हज यात्राही होते की नाही अशी स्थिती आहे. असे असताना राजधानी दिल्ली येथे मुस्लिम समूदयाने इतका मोठा कार्यक्रम घेण्याची गरजच काय होती, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
देशभरात लॉकडाऊन असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर जमाव जमा करुन देशातील इतर जनतेच्या आरोग्यास धोका पोहोचवल्याबद्दल आणि कायदा व सुव्यवस्था याचे पालन न केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. केवळ गुन्हे दाखल करुनच थांबू नये तर त्यांची रवानगी थेट तुरुंगात करण्यात यावी, अशी मागणीही खा. संजय राऊत यांनी या वेळी केली. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस संसर्गाचे महाराष्ट्राशी निजामुद्दीन कनेक्शन)
दिल्ली येथील निजामुद्दीन दर्गा येथे काही धार्मिक कार्यक्रमासाठी देशविदेशातील सुमारे 1800 पेक्षाही अधिक लोक एकत्र आले होते. त्यातील काही जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. त्यातच यातील अनेक लोक देशाच्या विविध राज्यांमध्ये गेले. त्यामुळे कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने चालवलेल्या उपाययोजनांमध्ये आणखी एका नव्या आव्हानाचा समावेश झाला आहे. या दर्ग्यातील कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले काही लोक महाराष्ट्रातही आले आहेत. त्यापैकी पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर आणि नाशिक येथील काही लोकांना शोधून क्वारंटाईन करण्यात आले आहे.