Coronavirus: पुण्यातील अनेक भागात संचारबंदी झाली कडक; दुकाने फक्त दोन तासच सुरु राहणार, मास्कशिवाय बाहेर फिरण्यास मनाई
यामध्ये मुंबई व पुणे येथे अनुक्रमे 116 व 18 रुग्णांची नोंद झाली आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 1018 झाली आहे
महाराष्ट्रात आज कोरोना विषाणू (Coronavirus) बाधित 150 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मुंबई (Mumbai) व पुणे (Pune) येथे अनुक्रमे 116 व 18 रुग्णांची नोंद झाली आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रातील (Maharashtra) एकूण रुग्णांची संख्या 1018 झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) शहरातील अनेक भागात निर्बंध लादले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवांशी संबंधित दुकाने (वैद्यकीय आणि रुग्णालये वगळता) सकाळी 10 ते सकाळी 12 वाजेपर्यंत (फक्त 2 तासांसाठी) चालू राहणार असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.
एएनआय ट्वीट -
कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटना पाहता आज पुण्यातील उच्च अधिकाऱ्यांची महत्वाची बठक पार पडली. यामध्ये काही भागात संचारबंदी अजून कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पुढील परिसरांचा समावेश आहे – खडक पोलीस स्टेशन, मक्का मस्जिद, यादगार बेकरी ते दलाल चौक, शहीद भगत सिंह चौक, राजा टॉवर इ. तसेच मंगळवार पेठ आणि रविवार पेठ या भागातही संचारबंदी कडक केली जाणार आहे. स्वारगेट पोलिस स्टेशन परिसरात 7 भागांत तर कोंढवा पोलीस स्टेशन परिसरात 9 भागांत संचारबंदी कडक केली जाणार आहे. पुणे शहरात जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत (संचार बंदी) विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी माहिती दिली. (हेही वाचा: महाराष्ट्रात आणखी 150 नवे रुग्ण आढळले; राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1018 वर)
या संचारबंदीमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांनाच बाहेर संचार करायची परवानगी असेल. या प्रतिबंधित भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी सकाळी 10 ते 12 असा दोन तासांचाच अवधी असेल, ही सुविधाही परिसरपरत्वे पुरवली जाणार आहे. पोलीस याबाबत घोषणा करतील. या काळातही खरेदी करताना लोकांनी सोशल डीस्टन्सिंग पाळले नाही तर ते दुकान तत्काळ बंद करण्यात येईल. तसेच या प्रतिबंधित परिसरात मास्क लावल्याशिवाय बाहेर फिरण्यास सक्त मनाई असेल.