कोरोना वायरस बाधित दोन रुग्ण महाराष्ट्रात आढळले, पुणे येथील नायडू रुग्णालयात उपचार सुरु
दोन्ही रुग्ण हे पतीपत्नी आहेत. त्यां दोघांचीही कोरोना व्हायरस टेस्ट ही पॉझिटीव्ह आली आहे. त्यांच्यावर आवश्यक त्या सर्व प्रकारची काळजी घेऊन उपचार सुरु आहेत.
कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधीत दोन रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. दोन्ही रुग्णांची कोरोना व्हायरसची चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. या दोन्ही रुग्णांना पुणे येथील नायडू रुग्णालयात (Naidu Hospital in Pune) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांवरही उपचार सुरु आहेत. हे दोन्ही रुग्ण दुबई ( Dubai) येथून पुणे ( Pune) येथे काही दिवसांपूर्वीच दाखल झाले आहेत. त्यामुळे या दोन व्यक्ती पुणे येथे आल्यानंतर कोणाकोणाच्या संपर्कात आले याबाबत तपास सुरु आहे.
दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना कोरोना व्हायरस बाधीत दोन रुग्ण पुण्यात सापडल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. दोन्ही रुग्ण हे पतीपत्नी आहेत. त्यां दोघांचीही कोरोना व्हायरस टेस्ट ही पॉझिटीव्ह आली आहे. त्यांच्यावर आवश्यक त्या सर्व प्रकारची काळजी घेऊन उपचार सुरु आहेत.
एएनआय ट्विट
पुढे बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस बाधीत दोन रुग्ण आढळून असले तरी, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. मात्र, राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने जारी केलेल्या अचारसंहितेचे पालन जरुर करावे. ज्यामुळे अधिक दक्षता घेता येईल, असेही राजेश टोपे म्हणाले.
पुण्याच्या महापौरांनीही पुण्यात कोरोना व्हायरस बाधीत रुग्ण सापडल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. हे रुग्ण गेल्या काही दिवसांत कोणाकोणाच्या संपर्का आले. कोणत्या टॅक्सीने फिरले त्या टॅक्सीचे क्रमांक घेऊन संबंधितांशी संपर्क सुरु असल्याची माहितीही पुणे महापौरांनी दिली आहे.