Coronavirus: मुंबईच्या धारावीत कोरोनाचे 34 नवीन रुग्ण, संक्रमितांची संख्या 275 तर 14 जणांचा मृत्यू

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईतील धारावी येथे रविवारी कोरोनाचे 34 नवीन रुग्ण आढळले असून त्यामुळे संक्रमित लोकांनी एकूण संख्या 275 वर आली आहे. धारावीत कोरोनामुळे आतापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात या आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या 8 हजारांच्या जवळ पोहचली आहे.

Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधितांचा आकडा वाढत जात आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या रविवार संध्याकाळ पर्यंत 26 हजारच्या पार पोहचली, तर 800 हुन अधिकांची या व्हायरसविरुद्ध झुंज अपयशी ठरली. दरम्यान, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईतील धारावी (Dharavi) येथे रविवारी कोरोनाचे 34 नवीन रुग्ण आढळले असून त्यामुळे संक्रमित लोकांनी एकूण संख्या 275 वर आली आहे. धारावीत कोरोनामुळे आतापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात (Maharashtra_ या आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या 8 हजारांच्या जवळ पोहचली आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 440 नवीन रुग्ण आढळले आणि या दरम्यान 19 लोकांचा मृत्यू झाला. यापैकी 358 प्रकरणे तर 12 जणांचा मृत्यू फक्त मुंबईतील आहेत. मुंबईत कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 5049 वर पोहोचले आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत 323 लोकांचा मृत्यू झाला असून राज्यात संसर्ग झालेल्यांची संख्या 7628 वर पोहोचली आहे. (महाराष्ट्रात आज आणखी 440 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आकडा 8068 वर पोहचला, आरोग्य विभागाची माहिती)

दुसरीकडे, मुंबई करांना दिलासा देण्यारी गोष्ट म्हणजे शहरातील धारावी, माहीम आणि दादर जवळील हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणावरून सलग दुसर्‍या दिवशी कोणताही रुग्ण समोर आला नाही. या महानगरात कोरोना विषाणूच्या संक्रमितांची एकूण संख्या 5,194 झाली असून त्यापैकी 204 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांना घरीच राहावे असे आवाहन महाराष्ट्र सरकार करीत आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी 27 एप्रिलपासून धारावी येथे 350 खासगी क्लिनिक पुन्हा सुरू होतील अशी घोषणा केली. त्यांच्या मते, खाजगी दवाखाने बंद पडल्यामुळे धारावीच्या लोकांना नॉन-कोविड समस्यांसाठी सायन हॉस्पिटलवर अवलंबून राहावे लागत आहे. 11 एप्रिल रोजी शहरातील महानगरपालिका - बीएमसीने भागात राहणाऱ्या 7.5 लाख रहिवाशांचे कोविड-19 स्क्रिनिंग सुरू केले.

दुसरीकडे, लॉकडाउन वाढविण्याबाबत चर्चा करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही या महिन्याच्या अखेरीस निर्णय घेऊ. ते म्हणाले की 30 तारखेनंतर पुढे काय करायचे ते आम्ही ठरवू. राज्यातील जनतेला संयम धरावा लागेल आणि कोरोनाविरूद्ध लॉकडाउनशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत भारतात लॉकडाउनच्या कालावधीत वाढ केली. प्रधानमंत्री मोदी हे सोमवारी, 27 एप्रिल रोजी राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यासोबत राज्याची स्थिती आणि लॉकडाउन वाढवण्यासंबंधी चर्चा करतील.