Lockdown: मुंबई शहरात लॉकडाऊन काळात अडलेल्यांसाठी महिला रिक्षाचालक शितल सरोदे यांची मोलाची मदत

अडचणीच्या काळात मोफत रिक्षा सेवा मिळाल्याने अडचणीत असलेले प्रवासी नागरिकही खूश होत आहेत.

Auto-Rickshaw Driver Shital Sarode (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दशाची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) शहरसुद्धा याला अपवाद नाही. त्यामुळे नागरिक जीवनावश्यक कामासाठी घराबाहेर पडले तरी, त्यांना नियोजित ठिकाणी जाण्यासाठी वाहन मिळणे दुरापस्त झाले आहे. अशा अडचणीच्या वेळी शितल सरोदे (Shital Sarode) या महिला रिक्षाचालक मुंबईकरांसाठी विनामूल्य ऑटोरिक्षा (Auto Rickshaw) सेवा उपलब्ध करुन देत आहेत. अडचणीच्या काळात मोफत रिक्षा सेवा मिळाल्याने अडचणीत असलेले प्रवासी नागरिकही खूश होत आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने शितल सरोदे यांच्याशी संवाद साधला. या वेळी बोलताना शितल सरोदे यांनी सांगितले की, अनेक नागरिकांना अत्यावश्यक कारणांसाठी वाहन आवश्यक असते. यात रुग्णालय, वृद्ध नागरिकांची सेवा, लहान मुलं अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. अनेकदा काही सरकारी कर्मचाऱ्यांना, जे अत्यावश्यक सेवा देतात, त्यांनाही वाहन मिळत नाही. अशा वेळी या गरजूंना मी माझी रिक्षा उपलब्ध करुन देते. एखादा व्यक्ती अगदीच गरजू असेल तर अशा ग्राकांकडून मी रिक्षाचे भाडे घेत नाही. मी त्यांना मोफत रिक्षा प्रवास सेवा देते. मोफत रिक्षा सेवेबाबत मी कोणालाही माझा फोन क्रमांक दिला नाही. मात्र, ज्या लोकांना आवश्यकता असेल अशांना मी सेवा उपलब्ध करुन देते.

देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या स्थानबद्धतेत अधिक वाढ झाली आहे. राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील उद्योग-व्यवसाय, कंपन्या, कार्यालयं बंद आहेत. असंघटीत क्षेत्रातील कामंही बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांसमोर दोन वेळच्या जेवनाची भ्रातं निर्माण झाली आहे. अशा स्थितीत नागरिकांना अत्यावश्यक सेवा घ्यायची असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. (हेही वाचा, मुंबई: गोरेगाव पश्चिम द्रुतगती मार्गावर Suburban Diagnostics कडून नागरिकांसाठी 'COVID-19 Drive-Thru Collection Point' सुरू; ड्रायव्हिंग सीटवर बसल्या जागीच घेतले जाणार स्वॅब सॅम्पल)

एएनआय ट्विट

दरम्यान, देशातील कोरोना व्हायरस रुग्णांची ताजी आकडेवारी हाती आली आहे. या आकडेवारीनुसार भारतात गेल्या 24 तासात कोरोना व्हायरस बाधित तब्बल 47 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, संबंध देशभरात 1336 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. नव्या आकडेवारीनुसार देशभराती कोरोना व्हायरस सुग्णांची संख्या 18,601 इतकी झाली आहे. यात प्रत्यक्षात उपचार घेत असलेल्या 14759 रुग्ण आणि उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलेल्या 3252 रुग्णांचा समावेश आहे. तसेच, आतापर्यंतच्या कोरोना व्हायरस बाधित 590 मृतांचाही समावेश या आकडेवारीत आहे.