Coronavirus: कार्यालयात 50 % पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या भायंदर येथील कॉल सेंटरवर मुंबई पोलिसांची कारवाई

भाईंदर येथील लँडमार्क या इमारतीत हे कॉल सेंटर सुरु होते. या कॉलसेंटरमध्ये 50 टक्क्यांपेक्षाही अधिक कर्मचारी काम करत होते.

Coronavirus: Mumbai Police | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने सरकारी कार्यालंय, खासगी कंपन्या, व्यावसायिक यांना सक्त सूचना दिल्या आहेत. असे असतानाही काही कंपन्यांकडून राज्य सरकारच्या आदेशांची आणि सूचनांचे पालन होताना दिसत नाही. अशाच एका कार्यालयावर मुंबई पोलीस (Mumbai Police) आज (गुरुवार, 19 मार्च) कारवाई करताना दिसले. भायंदर  (Bhayandar) येथे एक कॉलसेंटर सुरु होते. या कॉलसेंटरमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत होते. पोलिसांनी कारवाई करुन हे कॉल सेंटर तत्काळ बंद करण्यास लावले.

भाईंदर येथे मुंबई पोलिसांनी कारवाई केलेले कॉल सेंटर हे एशीयन पेंट कंपनीचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. भाईंदर येथील लँडमार्क या इमारतीत हे कॉल सेंटर सुरु होते. या कॉलसेंटरमध्ये 50 टक्क्यांपेक्षाही अधिक कर्मचारी काम करत होते. राज्य सरकारने कोरोना व्हायरस नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनांचे हे एक प्रकारे उल्लंघनच होते. या कॉल सेंटर बाबत माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली.

मुंबई शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच, सर्व चित्रपटगृह, शाळा, मॉल, व्यायामशाळा मोठी हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूकीचे प्रमाणही कमी करण्यात आले आहे. काही एसी लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, प्लॅटफॉर्म तिकीटांचे दरही वाढवत ते 10 रुपयांवरु प्रति तिकीट 50 रुपयांवर नेण्यात आले आहेत. हे सर्व करण्यामागे सरकारचा उद्देश इतकाच की, जमाव एकत्र आल्याने वाढणारा कोरोना व्हायरसचा धोका नियंत्रणात आणणे. (हेही वाचा, 'Coronavirus चा उपचार होणार' असे फलक लावणाऱ्या वसई आणि नालासोपारा मधील दोन डॉक्टरांवर कारवाई)

दरम्यान, खासगी कंपन्या आणि कार्यालय प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कामासाठी प्रत्यक्षात कार्यालयात न बोलवता 'वर्क फ्रॉम होम' ही संकल्पना राबवावी. जेणेकरुन अधिक लोक येकत्र येणार नाहीत आणि कोरोना व्हायरस विषाणूचा धोका वाढणार नाही. ज्या कंपन्या, कार्यालयं राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत राज्य सरकारने या आधीच दिले आहेत. दरम्यान, ठाणे शहरानजिक असलेल्या बाळकूम परिसरातील एका व्यायामशाळेवरही पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच कारवाई केल्याचे समजते.