Coronavirus: मुंबईत सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरु राहणार, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर महत्वाचा निर्णय
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशात 400 च्या पार तर महाराष्ट्रात 89 वर पोहचला आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी सुरु राहणार आहेत.
देशभरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशात 400 च्या पार तर महाराष्ट्रात 89 वर पोहचला आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी सुरु राहणार आहेत. पण अन्य सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी काळजी घेतली जात आहे. याच कारणास्तव आता मुंबईतील पेट्रोल पंप सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
महाराष्ट्रात नागरिकांना लॉकडाउनची परिस्थिती गांभीर्याने घ्यावी असे आवाहन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच रविवारी देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. मात्र त्यानंतर सोमवारी पुन्हा नागरिकांनी सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर गर्दी केल्याचे दिसून आले. राज्यात कलम 144 लागू केला असला तरीही नागरिकांकडून त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दीचे प्रमाण कमी न केल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा पाहता पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या कामाच्या वेळा ठरवल्या आहेत. त्यामुळे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरु राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Coronavirus: लॉकडाऊन काळात काय करावे, करु नये?)