महाराष्ट्र: लॉकडाउनच्या काळात राज्यात कलम 188 नुसार 57 हजारांपेक्षा अधिक गुन्हे दाखल तर 12123 जणांना अटक

तसेच 12 हजार 123 व्यक्तींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

Police| (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे नागरिकांना आता सुद्धा फक्त अत्यावश्यक सेवासुविधांसाठी घराबाहेर पडता येणार आहे. मात्र जर विनाकारण घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तर राज्यात लॉकडाउनच्या काळात कलम 188 अंतर्गत 57 हजारांपेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 12 हजार 123 व्यक्तींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनच्या काळात विविध राज्यात नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे नियमांच्या विरोधात वागणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात नियमांचे उल्लंघन केल्याने तब्बल 31 हजार गुन्हे विविध पोलीस स्थानकात दाखल करण्यात आले होते. तर आता कलम 188 अंतर्गत 57 हजार 517 गुन्हे दाखल आणि 12 हजार 123 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच 40 हजार 414 वाहने जप्त केली आहेत. त्याचसोबत अवैध वाहतूक करणाऱ्या 1051 वाहनांवर गुन्हे, परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या 15 गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.(मुंबईतील धारावीत आणखी 30 रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची संख्या 168 वर पोहचली)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा आता 4 हजाराच्या पार गेला आहे. त्यामुळे सध्याची राज्यातील परिस्थिती गंभीर असून नागरिकांनी नियमाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. तर सरकार सुद्धा कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच कोरोनामुळे फटका बसलेल्या कामगार वर्गासाठी सुद्धा शेल्टर्स होमची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी बेजबाबदारपणे वागणे टाळून कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी नियमांचे पालन करावे हेच आवाहन वारंवार नागरिकांना केले जात आहे.