Lockdown च्या दुसऱ्या टप्प्यात रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक बंदच; 20 एप्रिल पासून 'या' उद्योगांना मिळणार परवानगी- उपमुख्यमंत्री अजित पवार

सोमवार 20 एप्रिल पासून कठोर नियमांसह काही उद्योग सुरु करण्यास परवानगी देत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar, Deputy Chief Minister of Maharashtra | (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसचा वाढत्या विस्तारामुळे निर्माण झालेला धोका लक्षात लॉकडाऊनचा कालावधी 19 दिवसांनी वाढवण्यात आला. मात्र राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल केले जातील असे संकेत यापूर्वी राज्य सरकारकडून मिळाले होते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 20 एप्रिल पासून काही उद्योगांना परवानगी मिळेल असे जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक बंद राहणार असून सण, उत्सव देखील सार्वजनिक स्वरुपात साजरे करता येणार नाहीत. मात्र जीवनावश्यक सेवा, आरोग्य सुविधा सुरळीत सुरु राहाव्यात म्हणून काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवनगी देण्यात आली आहे. सोमवार, 20 एप्रिल पासून कठोर नियमांसह काही उद्योग सुरु करण्यास परवानगी देत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मात्र या काळात नियम आणि आदेशांचे कोटेकोर पालन करण्याची अट घालण्यात आली आहे.

निवडक व्यवसाय, ग्रामीग भागातील उद्योग, शेतीची कामे, दुकाने यांना परवानगी देण्यात आली आहे. दूधव्यवसाय, पशुपालन, मत्स्योद्योग सुरु करता येतील. अनाथालये, वृद्धाश्रम यांसारख्या सामाजिक संस्थांचं कामकाजही सुरु राहील. रोजगार हमी योजनेची कामेही सुरु राहणार आहेत. बँका, वित्तीय संस्थांचे व्यवहार सुरु राहणार असले तरी त्या ठिकाणी गर्दी करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. विशेष म्हणजे अंगवाड्या बंद असल्याने बालकांना पोषक आहार घरपोच दिला जाणार आहे. (कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्राला आर्थिक सहकार्य करावे; राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी)

MAHARASHTRA DGIPR Tweet:

लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यातही जीवनावश्यक सुविधांचा पुरवठा सुरळीत सुरु राहील. दवाखाने, हॉस्पिटल, औषधांची दुकाने, पॅथोलॉजी सेंटर, ॲम्बुलन्स या आरोग्यविषयक सेवा देखील सुरु राहतील असे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वस्त केले आहे. तसंच शाळा, महाविद्यालये बंद असली तरी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माध्यमातून शिकण्यावर भर द्यावा असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याठी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.