Coronavirus: महाराष्ट्रामध्ये पुहा Lockdown लागण्याची शक्यता; निर्बंध पाळले जात नसतील तर लॉकडाऊनची तयारी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

ऑक्सिजन पुरवठा, खाटांचे प्रमाण त्वरेने वाढवा. ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहर व परिसरातील सुविधा मिळण्याची व्यवस्था करा. केवळ मुंबई-पुण्यावर लक्ष केंद्रित न करता राज्याच्या सर्व भागात आरोग्य सुविधा कमी पडणार नाही हे पाहण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश दिले

CM Uddhav Thackeray | (Photo Credit- Facebook)

मार्च महिन्यात महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेले काही दिवस दिवसाला 30 हजाराच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. सरकार सर्व उपाययोजना राबत आहेच मात्र अजूनही जनता निष्काळजी असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने, बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून, आज याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लॉक डाऊनसारखे (Lockdown) अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या.

टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली. यावेळी, मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी. तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

या बैठकीमध्ये, ऑक्सिजन पुरवठा, खाटांचे प्रमाण त्वरेने वाढवा. ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहर व परिसरातील सुविधा मिळण्याची व्यवस्था करा. केवळ मुंबई-पुण्यावर लक्ष केंद्रित न करता राज्याच्या सर्व भागात आरोग्य सुविधा कमी पडणार नाही हे पाहण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश दिले. यासह गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा. प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी. विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत. सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रोम होम पद्धतीतून काम करू द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीच्या प्रारंभी आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी, राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटीलेटर, व ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत, अशी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आणले. ते म्हणाले की, सध्या 3 लाख 57 हजार आयसोलेशन खाटापैकी 1 लाख 7 हजार खाटा भरल्या आहेत आणि उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. (हेही वाचा: Coronavirus Vaccination: मुंबईत नागरिकांच्या दारोदारी जाऊन लस देण्यास परवानगी नाही)

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय, मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावे लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement