Coronavirus In Mumbai: मुंबईतील कोविड 19 विरूद्धच्या लढाईत महापौर किशोरी पेडणेकर रस्त्यावर; दादरच्या भाजी मंडईत मास्क वाटप
बीएमसीने मास्क न घातलेल्यांना दंड ठोठावण्यास सुरूवात केली आहे यासाठी मार्शल्स ची नेमणूक झाली आहे.
मुंबई मध्ये पुन्हा कोरोना वायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत आहे. मागील काही महिन्यांपासून नियंत्रणामध्ये असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आता बीएमसीने मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझर वापरण्याचं आवाहन केले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या सध्या थेट रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. भायखळा ते सीएसएमटी स्टेशन रेल्वेप्रवास आणि स्थानकांची पाहणी, शिवाजी पार्क मैदान परिसरामध्ये भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आज सकाळी महापौर दादरच्या भाजी मंडई, फूल मार्केटमध्ये आल्या. कोविड-19 जनजागृतीसाठी महापौर किशोरी पेडणेकर यांचा लोकलने प्रवास; नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन.
दादरची भाजी मंडई ही घाऊक बाजारपेठ असल्याने इथे मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्कचा कटाक्षाने वापर करावा असे आवाहन करताना किशोरी पेडणेकर यांनी ज्यांच्याकडे मास्क नाही त्यांना समज देत मास्कचं वाटप देखील केले आहे.
किशोरी पेडणेकर यांचं दादर मध्ये मास्क वाटप
दादर मध्ये किशोरी पेडणेकर यांच्यासोबत पोलिस प्रशासन देखील होते. लोकांमध्ये पोलिसांची भीती असते त्यामुळे सहाजिकच त्यांच्या दरारामुळे लोकांना मास्क घालण्याची जबाबदारी आपुसकच येते. बीएमसीने मास्क न घातलेल्यांना दंड ठोठावण्यास सुरूवात केली आहे यासाठी मार्शल्स ची नेमणूक झाली आहे.
मुंबई मध्ये काल कोरोना रूग्णांची संख्या ही मागील 24 तासांत 760 होती. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाढती रूग्णसंख्या पाहता आता दंडात्मक कारवाईसोबत गुन्हा दाखल करण्यासही सुरूवात झाली आहे.