Coronavirus in Mumbai: राज्यात कोरोनाचा धोका वाढला; मुंबईमध्ये आज तब्बल 1167 रुग्णांची नोंद

या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईमधील आजच्या कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा 1 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू रुग्ण संख्येमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईमधील आजच्या कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा 1 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईमध्ये आज कोरोनाच्या 1167 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संक्रमितांची संख्या 32,1698 झाली आहे. आज शहरात 376 कोरोना रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 30,10,57 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 8,320 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज शहरामध्ये 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 11,453 कोरोना रुग्ण दगावले आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यामध्ये 4 रुग्ण पुरुष होते त्यांचे वय 60 वर्षावर होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 94 टक्के आहे. 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.24 टक्के राहिला आहे. 23 फेब्रुवारी 2021 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 31,85,334  आहेत व मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर आता 294 दिवस झाला आहे.

सध्या शहरामध्ये जास्त लक्षणे व गंभीर रुग्ण तसेच मध्यम लक्षणे व दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांसाठी 13,119 बेड्स उपलब्ध आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 23 फेब्रुवारी 2021 नुसार शहरात सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या 51 आहे. सक्रिय सीलबंद इमारती या 815 आहेत.

(हेही वाचा: देशात 1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा जास्त आणि 45 वर्षांपेक्षा जास्त आजारी व्यक्तींना दिली जाणार कोरोना लस, सरकारी केंद्रांवर मिळणार मोफत)

दरम्यान, राज्यात आज 8807 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2772 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2008623 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 59358 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70% झाले आहे.