Coronavirus in Mumbai: मुंबई मधील कोरोना बाधितांचा आकडा 1,69,693 वर; आज 2,085 नव्या रुग्णांची भर, 41 जणांचा मृत्यू
आजही रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे.
कोरोना बाधितांच्या संख्येत अग्रस्थानी असलेल्या महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या मुंबई (Mumbai) शहरात सुरुवातीपासूनच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे पाहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी नव्या रुग्णांची वाढ नियंत्रणात येत असल्याचे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या झपाट्याने वाढायला लागली आहे. आज मुंबई मध्ये 2,085 नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीमुळे शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 1,69,693 वर पोहचला आहे. त्यापैकी 30,271 सक्रीय रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून असून 1,30,918 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण 8,147 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून (Brihanmumbai Municipal Corporation) देण्यात आली आहे.
राज्यातील कोविड-19 संसर्गामुळे वाढत असलेली कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी 15 सप्टेंबर पासून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या अभियानाला राज्यात सुरुवात होत आहे. या अभियानाअंतर्गत विशेष पथकं घरोघरी पोहचून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करणार आहेत. त्या पथकांना चांगला प्रतिसाद देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसंच मुंबई, ठाणे, पुणे या शहरांसह राज्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्यासोबतच जबाबदारी उचलण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री आज सांगितले. (Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात 22,543 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 लाख 60 हजार 308 वर)
ANI Tweet:
दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 10,60,308 वर गेला आहे. आज 22,543 नव्या रुग्णांची भर पडली असून 416 मृतांची नोंद झाली आहे. तर 11,549 रुग्णांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 10,60,308 पैकी 7,40,061 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या राज्यात 2,90,344 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे गरजेचे आहे.