पुणे मध्ये प्लाझ्मा थेरपीची तयारी पूर्ण; 'ससून' हॉस्पिटलमधून येत्या 2-3 दिवसांत सुरूवात होण्याची शक्यता
अनेक ठिकाणी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग देखील कोरोनासाठी करण्यास सुरूवात झाली आहे. अशामध्ये आता ही प्लाझ्मा थेरपी पुणे शहरात लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई, पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढवणारी असली तरीही आता गंभीर प्रकृती असलेल्यांसाठी आरोग्यक्षेत्रातून मोठी दिलासादायक बातमी महाराष्ट्राला मिळाली आहे. दरम्यान कोरोनावर अद्याप औषध किंवा लस नसल्याने इतर उपचारांनीच त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक ठिकाणी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग देखील कोरोनासाठी करण्यास सुरूवात झाली आहे. अशामध्ये आता ही प्लाझ्मा थेरपी पुणे शहरात लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सकाळच्या वृत्तानुसार, पुण्यात प्लाझ्मा थेरपीची तयारी पूर्ण झाली असून येत्या 1-2 दिवसांमध्ये त्याची सुरूवात होऊ शकते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील या वृत्ताला ट्वीटरच्या माध्यमातून दुजोरा दिला आहे. दरम्यान कालच (23 एप्रिल) भारत सरकारची केंद्रीय समिती पुण्यामध्ये दाखल झाली होती. त्यांनी मुंबईप्रमाणेच पुण्यातही परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
आयसीएमआर ने भारतामध्ये प्लाझ्मा थेरपीला परवानगी दिली आहे. याच्या थेरपीच्या माध्यमातून कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला जीवनदान मिळू शकते. यासाठी कोरोनामुक्त रूग्णाच्या शरीरातून अॅन्टीबॉडीज काढून त्याचा प्लाझ्मा गंभीर प्रकृती असलेल्या रूग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. यामुळे कोरोना व्हायरसचा शरीरात संसर्ग पसरण्याचा वेग मंदावू शकतो. यापूर्वीही अनेक साथीच्या आजारांमध्ये अशाच प्रकारए प्लाझ्मा थेरपी वापरण्यात आली होती. प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल? जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती.
महाराष्ट्रात पुणे, मुंबई शहरं ही हॉटस्पॉटपैकी एक आहेत. त्यांच्यामध्ये रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्द्यविकार अशा आजारांच्या रूग्णांची बळी जाण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षण दिसताच सुरूवातीच्या टप्प्यात कोरोनाची चाचणी करून घ्या आणि हा आजार आटोक्यात ठेवण्यासाठी मदत करा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या सहा हजारांच्या पार गेली आहे. तर मृतांचा आकडा 283 पर्यंत पोहचला आहे.