Coronavirus in India: कोरोना व्हायरसमुळे चिकनची विक्री घटली; पालघर जिल्ह्यात नऊ लाख अंडी, दीड लाख कोंबड्या केल्या नष्ट

या गोष्टीचा परिणाम फक्त मानव जातीवरच नव्हे व्यवसायावरही झाला आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगात 3000 हून अधिक मृत्यू झाले आहेत, एक लाखहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. या गोष्टीचा परिणाम फक्त मानव जातीवरच नव्हे व्यवसायावरही झाला आहे. या विषाणूच्या भीतीने सध्या मांसाहार (Non Veg) करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे चिकनला (Chicken) अपेक्षित भाव मिळेनासे झाले आहे. यामुळे पालघर (Palghar) जिल्ह्यातील एक पोल्ट्री व्यावसायिकाने नऊ लाख उबलेली अंडी तसेच पावणेदोन लाख कोंबड्यांच्या पिल्लांना नष्ट केले आहे. डॉ. सुरेश भाटलेकर असे या व्यावसायिकाचे नाव आहे.

भाटलेकर यांच्या दोन हॅचरी व 35 पोल्ट्री उद्योग आहेत. सध्या त्यांच्याकडे 90 हजार कोंबड्या विक्रीसाठी तयार आहेत. त्यात या पिलांपासून 40 दिवसांत कोंबडी तयार होते. यासाठी 75 रुपये इतका खर्च येतो. मात्र सध्या कोरोना विषाणूच्या धास्तीने लोकांनी मांसाहार करणे सोडून दिले आहे. यामुळे या सर्व कोंबड्या तशाच शेडमध्ये आहेत. दुसरीकडे कोंबडीचे तयार मांसही तसेच पडून आहे. ते साठवण्यासाठी 10-15 रुपये प्रतिकिलो खर्च येतो, मात्र चिकनची विक्री सध्या बरीच कमी आली आहे, त्यामुळे या चिकनचे काय करावे? असा प्रश्न व्यावसायिकांसमोर आहे. अशाप्रकारे कुक्कुटपालन व्यवसाय सध्या बराच तोटा सहन करत आहे. (केरळमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा कोरोना विषाणूची लागण; भारतातील एकूण रुग्णांची संख्या 40)

कोंबडीपासून तयार झालेली अंडीही बराच काळ ठेवता येत नाहीत म्हणून, डहाणू येथील हॅचरी मालकाने 9 लाख अंडी नष्ट केली आहेत. सोबत तयार कोंबड्यांना व त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या पिल्लांना खाद्य पुरवण्यासाठी पैसे नसल्याने सुमारे पावणेदोन लाख कोंबडीच्या पिल्लांनाही नष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, केरळमधील (Kerala) एकाच घरातील 5 जणांचा कोरना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे भारतातील कोरोना संसर्गाची एकूण संख्या 40 वर पोहचली आहे. या व्हायरसचा फटका अनेक बड्या कंपन्यांनाही बसला आहे. फेसबुकने (Facebook) शुक्रवारी सांगितले की, ते लंडन आणि सिंगापूर येथील कार्यालय बंद करत आहेत.