Lockdown: कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम, 3 मे नंतर लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता- शरद पवार

आजची स्थिती पाहता राज्याला महसुली तुटीचा सामना करावा लागेल, असे पवार म्हणाले. या वेळी राज्याची महसुली तूट ही 1 लक्ष 40 हजार कोटींच्या आसपास इतकी असू शकते. म्हणजेच राज्याचे 40 टक्के उत्पादन घटू शकते, असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

येत्या 3 मे रोजी लॉकडाऊन (Lockdown) दुसरा टप्पा पूर्ण करत आहे. दुसऱ्या टप्प्यानंत लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. ही शिथिलता मिळाली तरी नागरिकांनी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची काहीच आवश्यकता नाही. 4 मे नंतर काय याबाबत सरकार नव्या गाईडलाईन्स लवकरच जाहीर करेन. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट भयानक आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे पालन करायला हवे, असे अवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे, असेही शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून देशातील जनतेशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.

दरम्यान, लॉकडाऊनचा राज्य आणि देशातील अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठा विपरित परिणाम झाला आहे. राज्य आणि देशातील उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत. सहाजिकच या सर्वांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो. 40 दिवसांपेक्षाही अधिक काळापासून कारखाने, व्यापार, व्यवहार सारं काही बंद आहे. या सगळ्यात उद्योजकांना जसा फटका बसला आहे. तसाच, अनेक नागरिकांचे रोजगार गेले आहेत, असेही पवार या वेळी म्हणाले.

राज्याचा सन 2020-21 चा अर्थसंकल्प पाहता राज्याचे महसूली उत्पन्न हे 3 लक्ष 47 हजार कोटी इतके होते. आजची स्थिती पाहता राज्याला महसुली तुटीचा सामना करावा लागेल, असे पवार म्हणाले. या वेळी राज्याची महसुली तूट ही 1 लक्ष 40 हजार कोटींच्या आसपास इतकी असू शकते. म्हणजेच राज्याचे 40 टक्के उत्पादन घटू शकते, असेही पवार म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus: पंजाबमध्ये लॉकडाऊन 2 आठवड्यांनी वाढवला; महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार?)

दरम्यान, देशाचा विचार करता महाराष्ट्रात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या अधिक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातही हे प्रमाण मुंबई, पुणे येथे अधिक आहे. दाट लोकवस्ती आणि गर्दीची ठिकाणे आदी कारणांमुळे या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.असे असले तरी मुंबई पुणे आणि संबंध राज्यभरातच महापालिका आणि शासकीय यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम हाती घेतला आहे. चाचण्यांचे प्रमाणही वाढवले आहे. त्यामुळे कोरोनावर लवकरात लवकर मात कण्यात येईल, असा आशावादही पवार यांनी व्यक्त केला.