Coronavirus in Maharashtra: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू करावी' काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांची मागणी
त्यामुळे पंतप्रधानांनीच आता यात लक्ष घालून संविधानातील कलम 360 अन्वये महाराष्ट्रात दोन महिन्यांसाठी आर्थिक आणि आरोग्य आणिबाणी लागू करावी. ही परिस्थीती अशीच राहिली तर लोकांचा उद्रेक होईल. लोक रस्त्यांवर उतरतील. त्यातून वेगळेच आव्हान निर्माण होईल, असे आशिष देशुमुख यांनी म्हटले आहे.
राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असे दिसते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्रात आर्थिक आणि आरोग्य विषयक आणीबाणी लागू करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केली आहे. आशिष देशमुख यांनी या संदर्भात एक पत्रही पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहे. दरम्यान, काँग्रेसने मात्र आशिष देशमुख यांच्या मागणीबाबत सावध प्रतिक्रिया देत ती त्यांची वैयक्तीत भूमिका आहे. पक्षाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. आशिष देशुख यांच्या विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर काहींचे म्हणने असे की आणीबाणी लागून तरी कोरोना नियंत्रणात येईल का?
आशिष देशमुख यांनी राज्य सरकारला घरचा आहेर देत म्हटले आहे की, राज्य सरकार कोरोना नियंत्रणामध्ये तोकडे पडले आहे. राज्यात आतापर्यंत 60 हजारांपेक्षाही अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना नियंत्रण हे राज्य सरकारच्या हाताबाहेर गेले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनीच आता यात लक्ष घालून संविधानातील कलम 360 अन्वये महाराष्ट्रात दोन महिन्यांसाठी आर्थिक आणि आरोग्य आणिबाणी लागू करावी. ही परिस्थीती अशीच राहिली तर लोकांचा उद्रेक होईल. लोक रस्त्यांवर उतरतील. त्यातून वेगळेच आव्हान निर्माण होईल, असे आशिष देशुमुख यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, PM Narendra Modi Addresses The Nation: कोरोना विषाणूच्या लढाईमध्ये, प्रभू रामचंद्रासारखे मर्यादेचे पालन करण्याचे आणि रमजानमधील संयम व शिस्त अंगी बाळगण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन)
राज्यात कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी आजपासून लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे. अनेक निर्बंध घालूनही राज्यातील कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात आता अधिक कडक प्रमाणावर निर्बंध लावण्याची गरज सरकारमधील अनेक मंत्र्यांनी कालच्या (20 एप्रिल) मंत्रिमंडळ बैठकीत बोलून दाखवली. कोरोना व्हायरसची राज्यातील साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा झाली. या चर्चेवेळी राज्यात पुन्हा एकदा 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात यावा अशी चर्चा झाली. राज्य मंत्रिमंडळातील बैठकीनंतर मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील लॉकडाऊनची आज (21 एप्रिल) घोषणा करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतात गेल्या 24 तासात 2,95,041 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग तर 2,023 जणांचा मृत्यू झाला. सुमारे 1,67,457 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती देताना म्हटले आहे की, देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,56,16,130 इतकी नोंदली गेली. त्यापैकी आतापर्यंत 1,32,76,039 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1,82,553 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशात सध्या सक्रीय रुग्णांची संख्या 21,57,538 इतकी आहे.