Coronavirus: परीक्षा रद्द करण्याबाबत कोणताही निर्णय नाही, पुण्यातील 10 करोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर - विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर

एक-दोन दिवसांमध्ये राज्य सरकारकडून तसा आदेश आला तर, त्यात बदल केला जाऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाहीत त्यांनी स्वत:वर संयम बाळगत घरी अथवा वसतीगृहांमध्येच थांबावे. परीक्षा नाही म्हणून इतर ठिकाणी भटकू नये, असेही विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर या वेळी म्हणाले.

Divisional Commissioner Deepak Mhaisekar | (Photo Credits: ANI)

शाळा, महाविद्यालयांच्या सुरु असलेल्या परीक्षा रद्द करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. राज्य सरकारच्या आदेशानुसार त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. पुणे (Pune) येथील कोरना व्हायरस बाधित 10 रुग्णांची प्रकृती स्थितर आहे. तसेच, संशयितांवर डॉक्टर नजर ठेऊन असल्याची माहिती विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) दीपक म्हैसेकर (Deepak Mhaisekar) यांनी दिली आहे. कोरोना व्हायरस आणि एकूण परिस्थिती याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते पुणे येथे बोलत होते.

काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरीच थांबावे. विशेषत: विद्यार्थांना घेऊन पालकांनी सहल, कार्यक्रम अथवा शहराबाहेरचा प्रवास टाळावा. अगदी उद्यानातही खेळायला गेले तरी मुलांमुलांमध्ये सुरक्षीत अंतर राहील याची दक्षता पालकांनी घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन दोन मुलांमध्ये किमान 6 फुटांचे अंतर राहील याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, परिक्षांच्या वेळापत्रकात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही. एक-दोन दिवसांमध्ये राज्य सरकारकडून तसा आदेश आला तर, त्यात बदल केला जाऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाहीत त्यांनी स्वत:वर संयम बाळगत घरी अथवा वसतीगृहांमध्येच थांबावे. परीक्षा नाही म्हणून इतर ठिकाणी भटकू नये. परीक्षा नसलेल्या विद्यार्थ्यांनी बाहेर भटकू नये यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत, असेही विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर या वेळी म्हणाले.

पुढे बोलताना विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर म्हणाले, काही विद्यापीठांकडून आम्हाला विचारणा होत आहे की, वसतीगृहं खाली करावीत काय? मात्र, हा निर्णय सर्वस्वी विद्यापीठ प्रशासनाचा आहे. मात्र, कारणाशिवाय विद्यार्थ्यांनी वसतीगृहाबाहेर फिरु नये याकडे विद्यापीठाने लक्ष द्यायला हवे. एखादा विद्यार्थी वसतीगृहात राहतो आणि त्याच्या जेवनाची व्यवस्था नसल्याने तो बाहेर जात असेल तर त्याच्याकडे वसतीगृहाचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. (हेही वाचा, पुणे येथील एका दुकानातून तब्बल लाखांचे बनावट sanitizers जप्त; सॅनिटायझर, मास्कचा काळा बाजार रोखण्यासाठी पोलिस सज्ज)

दरम्यान, पुणे शहरात बाहेरुन येणाऱ्या खास करुन विदेशातून येणाऱ्या नागरिक, विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवले जाईल. कोरोना ग्रस्त भागात असलेल्या विद्यार्थी अथवा नागरिकाला इथे येण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. तसेच, कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर फसवणूक करणाऱ्यांवर कडक कावाई केली जाईल. सॅनेटायझर्समध्ये भेसळ करणाऱ्या तिघांना आम्ही कालच अटक केली आहे, अशीही माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.