Coronavirus: कोरोना व्हायरसबाबात व्हॉट्सऍपवर खोट्या माहितीचा प्रसार करणे पडले महागात; नाशिकमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल
चीनमध्ये जन्माला आलेल्या या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. एकीकडे कोरोना व्हायरसचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत
जगभरात सध्या करोना व्हायरसने (Coronavirus) आपली दहशत पसरवली आहे. चीनमध्ये जन्माला आलेल्या या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. एकीकडे कोरोना व्हायरसचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाबाबत खोट्या माहितीचा (Fake News) प्रसार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यातच नाशिक (Nashik) येथे कोरोना व्हायरसबाबत खोट्या माहितीचा प्रसार केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. याप्रकरणी प्रशासनही कठोर पाऊले उचलताना दिसत आहे.दरम्यान, कुणीही अशी खोटी माहिती पसरवू नये आणि नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन येवला पोलीस यांनी केले आहे.
ऋतिक लक्ष्मण काळे आणि सलीम पठाण असे आरोपींची नावे आहेत. ऋतिक हा येवला तालुक्यातील नागडे गावाचा रहिवासी आहे तर, सलीम पठाण हा निमगाव मढ येथे वास्तव्यास आहे. ऋतिक लक्ष्मण काळे आणि सलीम पठाण यांच्यावर सोशल मीडियावर अफवा पसरविल्या प्रकरणी कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवला तालुक्यातील पाटोदा ठाणगाव या गावात एकाला कोरोनाची लागण झाल्याची खोटी माहिती त्यांनी व्हॉट्सऍपवर शेअर केली होती. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले होते. परंतु, ही संपूर्ण माहिती खोटी असल्याची स्थानिक पोलिसांच्या लक्षात आले. तसेच या खोट्या माहितीचा प्रसार करण्यामागे ऋतिक आणि सलीम या दोघांचा हात असल्याचे उघड झाले. त्यानंतर खोट्या माहिती प्रसार केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोनाच्या विळख्यातून कसे रहाल सुरक्षित? बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून नागरिकांना मोलाचा सल्ला
पुणे शहरात 17 मार्च रोजी खोट्या माहितीचा प्रसार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली होती. पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये उतरलेल्या परदेशी पाहुण्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरविण्यात आली होती. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी बीडमध्येही अशाच प्रकारे अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायसची लागण होऊन आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून 42 लोकांना याची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे, नागरिकांनी घाबरू नये... स्वत:ची काळजी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.