Coronavirus: आपल्या प्रार्थनांमुळे मी मृत्यूच्या दाढेतून बाहेर; अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी रुग्णालयातून शेअर केला व्हिडिओ

त्यानंतर घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्रास वाढू लागल्याने त्यांना नागपुरातील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती अजून खालावल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात आणण्यात आले.

Navneet Kaur Rana (Photo Credit: Twitter)

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा (Navneet Kaur Rana) यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची (Coronavirus) लागण होती. त्यानंतर घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्रास वाढू लागल्याने त्यांना नागपुरातील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती अजून खालावल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. नुकताच नवनीत राणा यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात आपण आयसीयूतून बाहेर आलो असून प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.

“लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमधून आज मला सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे. आपल्या प्रार्थनांमुळे मी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. आपणा सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. गेले पाच-सहा दिवस मी अमरावती-नागपूर-मुंबई असा प्रवास केला. आपण चिंता करु नका. माझी लहान मुलंसुद्धा काळजी करत आहेत, त्यांनाही मी हा व्हिडीओ पाठवत आहे. मी आणखी चांगली कामे करावी म्हणून देवाने मला पुन्हा संधी दिली आहे. मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार” असे नवनीत राणा व्हिडिओच्या माध्यमातून बोलत आहेत.

नवनीत कौर राणा यांची फेसबूक पोस्ट-

नवनीत कौर राणा यांना 6 ऑगस्टला कोरोनाची लागण झाल्याने समोर आले होते. नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अमरावतीतील घरीच उपचार करण्यात आले. परंतू, नंतर त्रास वाढल्याने त्यांच्यावर नागपुरातील वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु झाले. मात्र, प्रकृती अजून खालावल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नवनीत राणा यांच्यासह पती- आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील 12 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु आहेत.