Coronavirus: नागपूर येथे बनावट सॅनिटायझरच्या कारखान्यावर पोलिसांची छापेमारी, चार जणांना अटक

यामध्ये चार जणांना अटक केली आहे.

Hand Sanitisers | Image For Representational Purpose (Photo Credits: Pixabay)

राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 49 वर जाऊन पोहचली आहे. याच पार्श्वभुमीवर नागरिक स्वत:ची काळजी घेण्यासाठी सध्या मेडिकल मधून सॅनिटायझर आणि मास्क खरेदी करत आहेत. परंतु बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा पाहता या गोष्टी बनावट पद्धतीने बनवल्या जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर आता नागपूर येथे एका बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांकडून छापेमारी टाकण्यात आली आहे. यामध्ये चार जणांना अटक केली आहे.

बाजार मार्गावरील बॉम्बे जवळ असलेल्या एका कारखान्यात बनावट सॅनिटायझर बनवण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या कारखान्यावर छापेमारी केली आहे. या कारखान्यातील साहित्य जप्त करण्यात आले असून त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. ऐवढेच नाही त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले आहेत.(राज्यात बनावट सॅनिटायझर विकणाऱ्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात- राजेंद्र शिंगणे)

तर दोन दिवसांपूर्वीच आरोग्य आणि पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता बनावट सॅनिटायझर बनवले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यानुसार कारवाईला सुरुवात सुद्धा केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. बाजारात सॅनिटायझरची वाढती मागणी पाहता त्याचा तुटवडा निर्माण झाला असून तो पुढील दोन दिवसात भरुन काढण्यात येईल असे म्हटले होते. गेल्या 8 दिवसात बनावट सॅनिटाझर विक्री करणाऱ्या 22 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.