मुंबई: 'कोरोना व्हायरस'च्या भीतीने श्री सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद; वैद्यकीय मदत कक्ष मात्र सुरु राहणार

प्रभादेवी (Prabhadevi) येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर (Shree Siddhivinayak Temple) आज, 16 मार्च संध्याकाळ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे.

Siddhivinayak Temple (संग्रहित संपादित प्रतिमा))

प्रभादेवी (Prabhadevi)  येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर (Shree Siddhivinayak Temple) आज, 16 मार्च संध्याकाळ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे. महाराष्ट्रासह देशभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला राज्य सरकारतर्फे सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशावेळी शेकडो भक्तांची रोज गर्दी असणारे सिद्धिविनायक मंदिरही बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात गरजू रुग्णांच्या सेवेसाठी वैद्यकीय मदत कक्ष मात्र सुरु ठेवण्यात येणार आहे. मंदिर प्रशासनाने सिद्धिविनायक मंदिरातील सर्व विधी पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले आहेत. यापूर्वी मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी घोषणा करून मंदिरात येणाऱ्या भाविकांना सॅनिटायझर वापरण्यास दिले जाणार असल्याचे सांगितले होते.

प्राप्त माहितीनुसार, याबाबत मंदिर प्रशासनातर्फे एक पत्रक जारी करून मंदिर यापुढे काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली गेली. यापूर्वी तुळजापूर मधील तुळजाभवानी मंदिर प्रशंसनीय सुद्धा 31 मार्च पर्यंत मंदिर बंद ठेवणार असल्याचे सांगितले आहे. केवळ मंदिरचे नव्हे तर राज्य सरकारच्या सूचनेननुसार सार्वजनिक गर्दीची सर्वच ठिकाणी एक एक करून बंद करण्यात येत आहेत, याच पार्श्वभूमीवर 'छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे हेरिटेज संग्रहालय' सुद्धा महिना भरासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे, देशभरातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. आतापर्यंत राज्यात 38 रुग्ण आढळले आहेत. यात पुणे येथे 16, मुंबई येथे 8,ठाण्यात 1,कल्याण मध्ये 1,नवी मुंबई 2,पनवेल 1,नागपूर 4,अहमदनगर 1 ,यवतमाळ ३,औरंगाबाद 1  असे रुग्ण आढळले आहेत.