अहमदनगर व मुंबई येथे आढळला कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण; Corona Virus मुळे दिल्लीतील 68 वर्षीय महिलेचा मृत्यू
दुसरीकडे मुंबईमध्ये (Mumbai) कोरोना विषाणू संक्रमित अजून एक रुग्ण आढळला आहे.
हळू हळू कोरोना व्हायरसने (Corona Virus) भारतात आपले रूप धारण करायला सुरुवात केली आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण झालेल्या लोकांची संख्या देशात 81 पर्यंत पोहचली आहे. यात आता अजून दोघांची भर पडत आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये (Mumbai) कोरोना विषाणू संक्रमित अजून एक रुग्ण आढळला आहे. तसेच दिल्लीमधून (Delhi) एक वाईट बातमी येत आहे. दिल्लीच्या रूग्णालयात 68 वर्षाच्या महिलेचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूमुळे होणारा हा दिल्लीतील पहिला आणि भारतातील दुसरा मृत्यू आहे. या महिलेच्या मुलालाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुबईला गेलेल्या 40 जणांपैकी अहमदनगर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा कोरोना व्हायरसचा रिपोर्ट सकारात्मक आला आहे. तसेच मुंबईमध्येही कोरोनाचा अजून एक रुग्ण मिळाला आहे. यासह राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 वर गेली आहे. पश्चिम दिल्लीतील एका 68 वर्षीय महिलेच्या मुलाला कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यानंतर ही महिलादेखील या विषाणूमुळे संक्रमित झाली होती. आता या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचीही समस्या होती. (हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज, जिम, जलतरण केंद्र बंद; मॉल्स आणि थिएटर मात्र खुली राहणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रतिबंधासाठी, राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. हा कायदा लागू झाला म्हणजे साथरोगाचा उद्रेक झाला असे नाही. प्रतिबंधात्मक उपायांसाठी अशाप्रकारे कायदा लागू करुन, राज्य शासन आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे अंमलात आणू शकते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. सध्या राज्यात कोरोना विषाणूमुळे बाधित असलेल्या रुग्णांची संख्या - पुणे – 10, मुंबई – 4, नगर -1, ठाणे – 1, नागपूर – 3