Corona Vaccination In Maharashtra: निर्णय होऊनही 18 ते 44 वयोगटासाठी महाराष्ट्रात 1 मेपासून लसीकरण सुरु होणार नाही- राजेश टोपे
त्यासाठी राज्य सरकार 6, 500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणासाठी देशभरासह महाराष्ट्रातील 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी येत्या 1 मे 2021 पासून कोरोना लसीकरण (Corona Vaccination) करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र 1 मे पासून या वयोगटासाठी लसीकरण करण्यात येणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आज (28 एप्रिल 2021) ही माहिती दिली. या वयोगटासाठी लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला असला तरी आवश्यक त्या प्रमाणात लस ( COVID 19 Vaccine) पुरवठा होत नाही. त्यामुळे लसीकरण करण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे जाहीर केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले असले तरी, हे लसीकरण करता येणार नसल्याचे टोपे या वेळी म्हणाले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाबाबत माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्राला 18 ते 45 वर्षे या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसींचे 12 कोटी डोस आवश्यक आहेत. त्यासाठी राज्य सरकार 6, 500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार असले तरी लगेचच त्याला गती येईल असे नाही. कारण तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध झाली पाहिजे. सध्यास्थितीत तेवढी लस उपलब्ध नाही. त्यामुळे 1 मे पासून 18 ते 45 या वयोगटासाठी सुरु होणारे लसीकरण होणार नसल्याचे टोपे म्हणाले.
राज्यातील लसीकरण कार्यक्रम केवळ सहा महिन्यांत संपवण्याचा निर्धार महाराष्ट्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारची इतक्या कार्यक्षमतेने लसीकरण करण्याची क्षमता आहे, असा विश्वासही राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. (हेही वाचा, Free Corona Vaccination In Maharashtra: 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत कोरोना लसीकरण, महाविकासआघाडी सरकारचा निर्णय)
राज्यातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Governmen) घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आज (28 एप्रिल) पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 6 हजार 500 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. राज्यात कोरोना व्हायरस संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. त्यासाठी कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची आवश्यकता आहे. ही आवश्यकता ओळखून सरकारने हा निर्णय घेतला आहे. येत्या 1 मे 2021 पासून देशभरात कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे.