पनवेल: CISF च्या 6 जवानांनी कोरोना विषाणूविरोधात जिंकली लढाई; रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात दिला निरोप
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईच्या (Mumbai) परिसरात आढळून आले आहेत.
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूने कहर केला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईच्या (Mumbai) परिसरात आढळून आले आहेत. शहरात अनेक ठिकाणी कोरोना विषाणूचे जाळे पसरत असताना पनवेल (Panvel) येथील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पनवेल येथे सीआयएसएफच्या 6 जवानांसह (CISF Jawan) एकूण 10 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले होते. मात्र, सर्वांचीच कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना पनवेल येथील कोव्हिड उपजिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाविरोधात लढाई जिंकल्यामुळे रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात सर्व निरोप दिला आहे. तब्बल दहा जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने, पनवेल आणि नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 4 एप्रिलला पनवेल तालुक्यात सीआयएसएफच्या 6 जवानांसह 10 जण कोरोनाबाधित आढळल्यानंतर, त्या सर्वांना पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैंकी तिघजण उलवे तर, एकजण घारखरचा रहिवाशी आहे. यांच्यावर मागील 16 दिवसात योग्य उपचार केल्यानंतर या सर्व 10 जणांची कोरोना टेस्ट आता निगेटिव्ह आली आहे. 10 जणांची दुसरी कोरोना चाचणीदेखील निगेटिव्ह आल्याने या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसचेच या सर्व दहा जणांना आता काही दिवस घरातच थांबण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे जाळे पसरत असताना हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. रात्री उशिरा या सर्व 10 जणांना रुग्णालयातून घरी सोडत असताना रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवत निरोप दिला. तसेच इतर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तेही लवकरच पूर्ण बरे होतील, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. हे देखील वाचा-महाराष्ट्र: Lockdown काळात वाईन शॉप वरील बंदी बाबत राजेश टोपे यांच्या 'या' विधानामुळे मद्यप्रेमींच्या आशा झाल्या पल्लवित
महाराष्ट्रात आजपर्यंत 507 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली आहे. कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, असे आवाहन त्यांनी केले होते. कोरोनाची लक्षणे लपवणे अत्यंत चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाची लक्षणे न दिसणाऱ्यांची संख्या अधिक आहे. थोडीशी जरी लक्षणे आढळली तर, तातडीने डॉक्टरांकडे जा असेही आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.