Congress MLA Ranjit Kamble: काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांच्यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
अजय डवले यांच्यात झालेल्या कथीत मोबाईल संवादाची एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. या क्लिपची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.
काँग्रेस आमदार (Congress MLA) रणजित कांबळे (Congress MLA Ranjit Kamble) यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिविगाळ करत जीवे मारल्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. आमदार रणजित कांबळे यांनी दिलेली कथीत धमकी आणि सरकारी कामात आणलेला अडथळा याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तक्रार दिल्याचे वृत्त आहे. या तक्रार अर्जाची एक प्रतही प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियातून व्हायरल झाली आहे. राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीचे अभुतपूर्व संकट आहे. त्यामुळे वैद्यकीत क्षेत्रावर आगोदरच मोठा ताण आहे. त्यात रुग्णांचे नातेवाईक आणि राजकारणातील काही लोक यांच्या मोठ्या दबावाला आरोग्य यंत्रणांना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, आमदार रणजीत कांबळे आणि आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांच्यात झालेल्या कथीत मोबाईल संवादाची एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. या क्लिपची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. प्राप्त माहितीनुसार 9 मे रोजी नाचनगाव येथे एक आरोग्य शिबीर पार पडले. या आरोग्य शिबिराची छायाचित्रे काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. हे फोटो आमदार कांबळे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना फोन केला आणि अर्वाच्य भाषा वापरली. या वेळी त्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही डॉ. अजय डवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. डॉ. डवले यांनी तक्रारवजा निवेदन दिले आहे. (हेही वाचा, Majha Doctor: कोरोनाशी लढण्यासाठी सीएम उद्धव ठाकरे यांनी सुरु केली 'माझा डॉक्टर' मोहीम; फॅमिली डॉक्टरांना नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन)
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना झालेल्या कथीत शिविगाळ झाल्याच्या प्रकरणानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेनं संताप व्यक्त केला आहे. या संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील कोरोना महामारीमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर आगोदर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी प्रचंड तणावात काम करत आहेत. अशा स्थितीत रुग्णांचे नातेवाईक आणि राज्यातील राजकाणी यांचा कारणाशिवाय दबाव यंत्रणेवर वाढतो आहे. त्याता अशा काही लोकांचे वर्तन अत्यंत चुकीचे आहे. तरी अशा लोकप्रतिधींवर गंभीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.