सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशबद्दल राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, 'भाजप प्रवेशापूर्वी चिरंजीवांनी माझा सल्ला घेतला नाही'
परिणामी सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसमधून बाहेरचा रस्ता धरत भाजपमध्ये प्रवेश केला. केवळ एका उमेदवारीसाठी पक्ष आणि कुटुंबाला अडचणीत आणण्याची खरोखरच आवश्यकता होती काय असा सवाल आता सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रेवेशामुळे उपस्थित होतो आहे.
Lok Sabha Elections 2019: काँग्रेस (Congress) पक्षातून बाहेर पडत भारतीय जनता पक्षात (bjp) प्रवेश करण्यापूर्वी आमचे चिरंजीव सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe-Patil) यांनी आपला सल्ला घेतला नाही. हा निर्णय त्यांनी स्वत:च्या बुद्धीने घेतला आहे. त्यात माझी कोणतीही भूमिका नाही, असे विधान सभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी म्हटले आहे. माझ्या मुलाने पक्षांतर केले आहे. हे खरे आहे. त्यानंतर माझ्या पदाबाबत (विरोधी पक्षनेते) अनेक चर्चा सुरु आहेत. मात्र, त्याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो मला मान्य असेन, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली.
विखे-पाटील घराणे सुरुवातीपासून काँग्रेससोबत, परंतू..
विखे-पाटील घराणे सुरुवातीपासून काँग्रेससोबत राहिले आहे. परंतू, मधल्या काही काळात बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. या पक्षांतराचे फळ म्हणून शिवसेनेकडून त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपदही मिळाले होते. दरम्यान, कालांतराने बाळासाहेब विखे पाटील हे आपल्या समर्थकांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले. त्यानंतर ते काँग्रेसमध्येच राहिले. पुढे बाळासाहेब विखे पाटील सक्रीय राजकारणातून काहीसे बाजूला झाले. मात्र, त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रुपात विखे-पाटील परिवार राज्याच्या राजकारणात आणि मंत्रिमंडळ, आणि विधिमंडळात विविध पदे भूषवत राहिला.
राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे विखे-पाटीलांची कोंडी
दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये उमेदवारी करण्यासाठी सुजय विखे-पाटील हे उत्सुक होते. त्यांना अहमदनगर मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. परंतू, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला. हा मतदारसंघ सुजय विखे-पाटील यांच्यासाठी सोडून त्याच्या बदल्यात राष्ट्रवादीला दुसरा एकादा मतदारसंघ देण्यासाठी काँग्रेस आणि पर्यायाने राधाकृष्ण विखे-पाटील आग्रही होते. मात्र, राष्ट्रवादीने त्याला दाद दिली नाही. अखेर सुजय विखे-पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी देण्यात यावी यासाठीही प्रयत्न झाला. परंतू, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस बधली नाही. या मतदारसंघावरील हक्क सोडण्यास राष्ट्रवादी राजी झाली नाही. परिणामी सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसमधून बाहेरचा रस्ता धरत भाजपमध्ये प्रवेश केला. केवळ एका उमेदवारीसाठी पक्ष आणि कुटुंबाला अडचणीत आणण्याची खरोखरच आवश्यकता होती काय असा सवाल आता सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रेवेशामुळे उपस्थित होतो आहे. (हेही वाचा, कोण हे पार्थ पवार, सुजय विखे-पाटील? अन त्यांचं कर्तृत्व काय? विजय शिवतरे यांनी डागली तोफ)
दरम्यान, शरद पवार यांनी व्यक्तिगत टीका केल्याने आपण दुखावलो गेलो असल्याची भावनाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.