Congress On BJP Over Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह प्रकरणाचा तपास एनसीबीने सोडून दिला आहे का? काँग्रेसचा सवाल 'भाजपचे षडयंत्र उघडकीस' आल्याची टीका
मोदी यांचे अत्यंत प्रिय व्यक्ती असलेल्या राकेश अस्थाना महासंचालक असलेल्या एनसीबीला सांवत यांनी आज तीन प्रश्न विचारले आहेत.
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Case) प्रकरणावरुन महाराष्ट्र काँग्रेसने (Congress ) भारतीय जनता पक्षावर (BJP) टीकास्त्र सोडले आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे सुरु असलेला या प्रकरणाचा तपास यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. एकूणच चौकशी आणि प्रकरणावर काँग्रेसने शंका उपस्थित करत प्रश्नांची मालिकाच सुरु केली आहे. या मालिकेत काँग्रेसने सुशांत सिंह प्रकरणाचा तपास एनसीबी (NCB) ने सोडून दिला आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, अभिनेता सुशांतसिंग प्रकरणाचा वापर करुन महाराष्ट्राला बदनाम करत राष्ट्रीय महत्व कमी करण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. या कटाचा एक भाग असलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला असून तो तात्काळ मंजूरही करण्यात आला आहे. या पांडेंना लवकरच भाजपाकडून मोठे बक्षीस मिळू शकेल यात शंका नाही, असा घणाघातही केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी हे टीकास्त्र सोडले आहे.
भाजपवर टीकास्त्र सोडत काँग्रेसने म्हटले आहे की, सुशांतनंतर आता बॉलिवूडला टार्गेट करण्याचे षडयंत्र रचले आहे. मोदी यांचे अत्यंत प्रिय व्यक्ती असलेल्या राकेश अस्थाना महासंचालक असलेल्या एनसीबीला सांवत यांनी आज तीन प्रश्न विचारले आहेत. (हेही वाचा, Prithviraj Chavan On PM Narendra Modi: कोरोना, चीन प्रश्न, अर्थव्यवस्था या प्रश्नांवर 'मोदी सरकार' साफ अपयशी ठरलं आहे; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधानांवर निशाणा)
काँग्रेसने विचारले प्रश्न
- मुंबईत एनसीबीचे अनेक वर्षांपासून कार्यालय आहे आणि बॉलिवूडही मुंबईतच आहे, असे असताना आतापर्यंत त्यांनी बॉलिवूड व ड्रग कनेक्शन संदर्भात चौकशी का केली नाही?
- सुशांत प्रकरणातील ड्रग अँगलच्या तपासासाठी ईडीने एनसीबीला पाचारण केले होते. एनसीबीने15/2020च्या पहिल्या एफआयआर नुसार आतापर्यंत एकही अटक केलेली नाही.
- या प्रकरणात ज्या अटक करण्यात आल्या आहेत त्या 16/2020 च्या दुसऱ्या एफआयआरनुसार केलेल्या आहेत मग एनसीबीने सुशांतसिंग प्रकरणाचा तपास सोडून दिला आहे का?
- बॉलिवूडला ड्रगशी जोडण्यासंदर्भात कोणतेही भक्कम पुरावे एनसीबीकडे नाहीत हे सरकारने संसदेत सांगितले आहे त्यावर एनसीबीचे मत काय?
दरम्यान, वरील प्रश्न विचारत काँग्रेसने पुढे म्हटले आहे की, बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांतसिंग प्रकरणात मुंबई पोलिसांची यथेच्च बदनामी केली. आता त्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला आणि तो तात्काळ मंजूरही करण्यात आला. वास्तविक पाहता यासाठी तीन महिन्यांची नोटीस द्यावी लागते परंतु पांडेंनी अर्ज दाखल करताच सरकारने मेहरबानी दाखवत तो मंजूर केला असून भाजपाकडून पांडेंना आणखी मोठे बक्षीस दिले जाण्याची शक्यता आहे.