IPL Auction 2025 Live

COVID-19 Third-Wave: डेल्टा प्लस व्हेरिएंटने महाराष्ट्राची चिंता वाढवली, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता

देशात गेल्या काही दिवसांपासून डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Coronavirus (Photo Credits: IANS)

कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेला समोरे गेल्यानंतर डेल्टा प्लस व्हेरिएंटने (Delta Plus Variant) सरकारची चिंता वाढवली आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. चिंताजनक म्हणजे, देशात डेल्टा प्लस प्रकारांची सर्वाधिक नोंद महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) झाली आहे. यामुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट (COVID-19 Third-Wave) येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे, देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते.

तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे येत्या काही दिवसांतच राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. यामागील प्रमुख कारण म्हणजे डेल्टा प्लस प्रकार राज्यात पसरत असल्याचे मानले जात आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे झालेल्या पहिल्या मृत्युची नोंद झाली आहे. रत्नागिरीमधील एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. हे देखील वाचा- Coronavirus In Mumbai: मुंबईत आज दिवसभरात 693 जण कोरोना संक्रमीत, 575 जणांना डिस्चार्ज

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले की, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमध्ये राज्यात पाच लाख मुलांसह 50 लाख लोकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत आठ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येऊ शकतात, असे शिंगणे यांनी बुलढाण्यात पत्रकारांना सांगितले आहे.

महाराष्ट्रात दररोज 9-10 हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. तर, डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळले आहेत. रायगड, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे ग्रामीण, रत्नागिरी, सातारा, पालघर आणि उस्मानाबादमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण पाच ते नऊ टक्के आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारने पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून स्थानिक प्रशासनाला आवश्यकतेनुसार निर्बंध कडक करण्याची सूट देण्यात आली आहे.