Communal Tensions: देशातील जातीय तणावाबाबत 13 विरोधी पक्षांनी जारी केले निवेदन; स्वाक्षरी करण्यास शिवसेनेचा नकार
सामाजिक एकोपा आणि एकसंधता बळकट करण्याचा आपला संयुक्त संकल्प व्यक्त करताना विरोधी पक्षनेते म्हणाले, ‘आम्ही आपल्या समाजात फूट निर्माण करू पाहणाऱ्या विषारी विचारसरणीचा मुकाबला करण्याच्या आमच्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो.’
13 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी देशातील जातीय हिंसाचार आणि द्वेषपूर्ण भाषणाच्या घटनांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी लोकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले. या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मौन'वरही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, विरोधकांच्या या सामायिक वक्तव्यापासून शिवसेनेने (Shiv Sena) स्वत:ला दूर ठेवले आहे. जातीय हिंसाचार निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या 13 विरोधी पक्षांनी शनिवारी एक निवेदन जारी केले. ज्यावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सह्या आहेत. यासाठी सेनेशी संपर्क साधण्यात आला, मात्र, त्यांनी नकार दिला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संमतीसाठी 6 तास वाट पाहिली आणि अखेर उद्धव ठाकरेंशिवाय निवेदन जारी करण्यात आले. यावरून दिसून येते की, शिवसेनेला मुस्लिम समर्थक अजेंड्यापासून स्वतःला दूर ठेवायचे आहे. या निवेदनासाठी सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. या निवेदनात अलिकडच्या काळात द्वेषयुक्त भाषणांना अधिकृत संरक्षण मिळत असल्याचा आरोप केला आहे. तसेच जातीय हिंसा भडकावणाऱ्या सशस्त्र धार्मिक मिरवणुकीबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.
एका संयुक्त निवेदनात, 13 विरोधी पक्षांनी म्हटले आहे की, अन्न, पेहराव, श्रद्धा, सण-उत्सव, भाषा यासारख्या मुद्द्यांचा वापर सत्ताधारी पक्षांकडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी केला जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह 13 नेत्यांनी यावत्र सह्या केल्या आहेत. (हेही वाचा: Raj Thackeray Threat: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना धमकीचा फोन, सुरक्षेत करणार वाढ)
10 एप्रिल रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर देशाच्या काही भागांतून जातीय हिंसाचाराच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर हे निवेदन जरी केले आहे. सामाजिक एकोपा आणि एकसंधता बळकट करण्याचा आपला संयुक्त संकल्प व्यक्त करताना विरोधी पक्षनेते म्हणाले, ‘आम्ही आपल्या समाजात फूट निर्माण करू पाहणाऱ्या विषारी विचारसरणीचा मुकाबला करण्याच्या आमच्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो.’