CM Uddhav Thackeray on Bollywood: 'बॉलिवूड संपवण्याचे अथवा इंडस्ट्री मुंबईतून स्थानांतरित करण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत'- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अभिनेत्याच्या मृत्यूनंतर लोकांनी नेपोटिझम, आउटसाइडर-इनसाइडर, ड्रग्जसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करून चित्रपटसृष्टीला घेराव घातला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई (Mumbai) व बॉलीवूडचे नाव सतत चर्चेत आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनानंतर बॉलिवूड (Bollywood) मध्ये खळबळ उडाली आहे. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर लोकांनी नेपोटिझम, आउटसाइडर-इनसाइडर, ड्रग्जसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करून चित्रपटसृष्टीला घेराव घातला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई (Mumbai) व बॉलीवूडचे नाव सतत चर्चेत आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी याबाबत आपले विचार मांडले आहेत. ते म्हणाले, ‘बॉलिवूडची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, हे वेदनादायक आहे. मुंबईतून बॉलिवूड स्थानांतरित करण्याचे प्रयत्न अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.’ गुरुवारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मल्टीप्लेक्स थिएटर मालकांशी झालेल्या बैठकीत प्रथमच आपली व्यथा व्यक्त केली आणि नोएडामध्ये नवीन फिल्म सिटी बनवल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, 'मुंबई केवळ महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणूनच नव्हे तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये सध्या हॉलिवूडच्या तोडीचे चित्रपट बनवले जात आहेत. जगभरात बॉलिवूड सिनेमाचे चाहते आहेत. सिनेमा हा एक मोठा उद्योग आहे, जो लोकांना रोजगार देतोते, सिनेमामुळे कलाकार लोकप्रिय ठरतात. पण गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक लोकांकडून बॉलिवूडची निंदा केली जात आहे, हे फार वाईट आहे.’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘करमणूक उद्योग राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देतो आणि राज्य सरकार चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्यास उत्सुक आहे.’ त्यांनी सिनेमा मालकांच्या बैठकीत सांगितले की, राज्याच्या सांस्कृतिक विभागाने सिनेमा हॉल पुन्हा सुरू करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया सुरू केली असून एसओपी फायनलनंतर सिनेमा हॉल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. (हेही वाचा: अतिवृष्टीमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा; वायूसेना, नौदल, लष्कर यांना हाय अलर्टवर सज्ज राहण्याच्या सूचना)

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यानंतर एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ED) आणि नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) यांची या प्रकरणामध्ये एन्ट्री झाली. एनसीबीच्या तपासणीत बॉलीवूडच्या ड्रग एंगलचा खुलासा झाला. यानंतर रिया चक्रवर्ती तुरुंगात गेली. अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना एनसीबीसमोर हजर व्हावे लागले. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने नुकतेच चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करण्यासाठी राज्यात फिल्म सिटी बनवण्याची योजना जाहीर केली आहे. या संदर्भात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या काही लोकांशी बैठकही घेतली होती.