CM Eknath Shinde on Rahul Gandhi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राहुल गांधींवर सडकून टीका; म्हणाले- '... नाहीतर रस्त्यावरून चालणे कठीण होईल'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले की, राहुल गांधी परदेशात जाऊन देशात लोकशाही धोक्यात असल्याचे सांगतात, पण ती खरीच धोक्यात असती तर, ते भारत जोडो यात्रा काढू शकले असते का? कलम 370 हटवल्यामुळेच काश्मीरमध्ये ध्वज फडकवता आला.
मानहानीच्या प्रकरणात गुजरातच्या सुरत न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्यांचे संसद सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. या घटनेनंतर राहुल गांधींनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधत आपण लोकशाहीसाठी लढतोय आणि घाबरत नाही असे म्हटले. यावेळी राहुल गांधी यांना परदेशी भूमीवर केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यासंबंधी प्रश्न विचारला असता, आपण वीर सावरकरांसारखे नसून माफी मागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण गांधी आहेत आणि गांधी कधीही माफी मागत नाहीत, असे ते म्हणाले.
आता यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सावरकर हे केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नसून संपूर्ण देशाचे आदर्श असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी सावरकरांची बदनामी केली आहे. या कृत्याबद्दल राहुल गांधींवर कितीही टीका केली तरी कमी पडेल. आजही ते म्हणाले की मी माफी मागणारा सावरकर नाही. सावरकरांबद्दल त्यांना काय वाटते? यासाठी राहुल गांधींना शिक्षा झाली पाहिजे.’
शिंदे पुढे म्हणाले, ‘काँग्रेसनेच बनवलेल्या कायद्याने राहुल गांधींना निलंबित केले आहे. याआधी लालू यादव आणि इतर अनेकांना अपात्र ठरवण्यात आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नव्हती का?. राहुल गांधी यांनी केवळ पंतप्रधान मोदींवरच टीका केली नाही तर संपूर्ण ओबीसी समाजाची बदनामी केली आहे. मला त्यांना सांगायचे आहे की, त्यांनी असेच बोलणे चालू ठेवले तर त्यांना रस्त्यावरून चालणे कठीण होईल.’ (हेही वाचा: India: The Modi Question- गुजरात दंगलीवर आधारीत BBC डॉक्युमेंट्रीचा महाराष्ट्र विधानसभेत निषेध)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले की, राहुल गांधी परदेशात जाऊन देशात लोकशाही धोक्यात असल्याचे सांगतात, पण ती खरीच धोक्यात असती तर, ते भारत जोडो यात्रा काढू शकले असते का? कलम 370 हटवल्यामुळेच काश्मीरमध्ये ध्वज फडकवता आला. तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खलनायक म्हणत आहात, त्यांना मोगॅम्बो म्हणत आहात, मात्र आज बाळासाहेब असते तर त्यांनी काश्मीरमधून कलम 370 हटवणाऱ्या अमित शहांना मिस्टर इंडिया म्हटले असते.’