Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार घडला पण घोडा खातेवाटपात अडला, वाद दिल्ली दरबारी
विस्तार झाला असला तरी सत्तावाटप मात्र अद्यापही झाले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अर्थ, महसूल आणि जलसंपदा खात्यावर अडून बसले आहे. तर राष्ट्रवादीला अर्थ खाते द्यायला शिंदे गटाचा विरोध आहे. परिणामी हा वाद आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडाने आणि तितक्याच वेगाने घडलेल्या एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराने (Cabinet Expansion) अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. विस्तार झाला असला तरी सत्तावाटप मात्र अद्यापही झाले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण सत्तावाटपात घोडा अडला, अशी काहीशी स्थिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अर्थ, महसूल आणि जलसंपदा खात्यावर अडून बसले आहे. तर राष्ट्रवादीला अर्थ खाते द्यायला शिंदे गटाचा विरोध आहे. परिणामी हा वाद आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. दरम्यान, हे तिघेही दिल्लीसाठी वेगवेगळे रवाना होऊ शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. हे तिन्ही नेते दिल्लीत भाजप नेतृत्वाची भेट घेणार असल्याचे समजते.
सत्तेत नव्यानेच सहभागी झालेला अजित पवार गट महत्त्वाच्या खात्यांसाठी अडून बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नऊ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. यात स्वत: अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ या राष्ट्रवादीच्या प्रमुख फळीतील नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांनी आपली एकूण राजकीय कारकीर्दच पणाला लावल्यामुळे त्यांचा महत्त्वाच्या पदासाठी आग्रह आहे. दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे म्हणने असे की, उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असताना अजित पवार यांनी निधी वापटपात असमानता अवलंबली होती. त्यामुळे याही वेळी त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद गेले तर पुन्हा मागचीच पुनरावृत्ती होऊ शकते. (हेही वाचा, CM Eknath Shinde Cabinet Expansion: तर बिघाडाही होऊ शकतो! अर्थखाते आणि अजित पवार यांच्यावरुन आमदार बच्चू कडू यांची सूचक प्रतिक्रिया)
महत्त्वाचे म्हणजे महसूलमंत्री आणि अर्थमंत्री पद हे भाजपकडे आहे. त्यात अर्थमंत्री पद हे स्वत: देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर महसूलमंत्री पद हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे हा गुंता कसा सोडवायचा हा प्रश्न तिन्ही नेत्यांसमोर आहे. परिणामी अनेक बैठका आणि बंद दाराआड चर्चा होऊनही तोडगा निघाला नसल्याने आता दिल्लीश्वरांची मदत घेतली जाणार असल्याचे समजते.