CM Eknath Shinde Ayodhya Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांसह 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर; शरयू नदीवर करणार आरती
यावर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणूक आयोगाने (ECI) शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि त्यांना ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह दिले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी जाहीर केले की, ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसह 9 एप्रिल रोजी अयोध्येला (Ayodhya) भेट देतील. या ठिकाणी ते शरयू नदीचे पूजन करतील. पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याची माहिती दिली. ते म्हणाले, मी 9 एप्रिलला माझ्या पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, 'कर सेवा' (रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात) सुरू असताना माझे गुरू स्वर्गीय आनंद दिघे यांनी अयोध्येत चांदीच्या विटा पाठवल्या होत्या. अयोध्या आणि प्रभू राम यांच्याशी आमचे जुने नाते आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही या विषयाकडे राजकारण म्हणून पाहिले नाही आणि पाहणार सुद्धा नाही. दुसऱ्यांदा आम्ही बोलू इच्छित नाही. शरयू नदीवर आरती करणार आहोत.
ते म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराचे बाळासाहेबांचे स्वप्न होते, ते पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत. यामध्ये खारीचा वाटा म्हणून आम्ही सागाची लाकडे मंदिरासाठी पाठवली आहेत. मंदिर निर्माणाधीन भागातही भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती ज्या प्रकारे वीर विनायक दामोदर सावरकरांच्या नावाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे, त्यादृष्टीने मुख्यमंत्री शिंदे यांची ही अयोध्या दौऱ्याची घोषणा राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून अयोध्या आणि रामलल्ला हे शिवसेनेच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिले आहेत. (हेही वाचा: मुंबईचे डब्बेवाले 3 ते 8 एप्रिल दरम्यान सुट्टीवर; चाकरमान्यांची होणार गैरसोय)
मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह भगवान रामाच्या धनुष्यबाणाशी जोडले आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणूक आयोगाने (ECI) शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि त्यांना ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह दिले. आपल्या पक्षाच्या निवडणूक चिन्हाचा संदर्भ देत शिंदे म्हणाले की, धनुष्यबाण हे चिन्ह आम्ही कधीही कोणाच्या विरोधात वापरण्याचे हत्यार म्हणून घेतलेले नाही.