खुशखबर! पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; मुख्यमंत्र्यांनी दिले पंचनामे करण्याचे आदेश
त्यामुळे लवकरच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळण्याची शक्यता आहे.
यंदा राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rains) झाला. अनेक ठिकाणी पुराच्या तडाख्यात (Flood) कित्येक लोकांचे नुकसान झाले. यामध्ये घरांसोबतच पिकांचेही अतोनात नुकसान झाले. आता अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तेथे तत्काळ पंचनामे करून मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याचा मुख्य सचिवांना याबाबत आदेश दिले आहेत. सीएमओ महाराष्ट्राने ट्विट करत ही माहिती दिली.
सप्टेंबर राज्यात अनेक ठिकाणी महापूर आला होता. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावे पाण्याखाली होती. त्यानंतर परतीच्या पावसाचा मराठवाडा, विदर्भाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. अशाप्रकारे सबंध महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले. आता मुख्यमंत्र्यांनी याबाबत पंचनामे करून तातडीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच ही प्रक्रिया सुरु होऊन शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहचेल अशी अशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, तळकोकणातली 9985 हेक्टर भातशेती पुरामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. यात 28 हजार 760 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात सोयाबीन, तूर, कापूस आणि भाजीपाल्यासह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील तीन लाख हेक्टरपेक्षा जास्त कापूस पिकाला सततच्या पावसाचा फटका बसलाय. या दोन्ही जिल्ह्यात अति पावसामुळे पिकांची नासाडी झाली आहे.