Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला सूचक इशारा; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या आढावा बैठकीस मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती
मात्र, भाजपचे नेते भेटून गेल्यावर जर राज्यपाल तातडीने बैठक लावत असतील तर मात्र विरोधकांच्या अशा राजकारणार प्रत्युत्तर दिले जाईल, असा संदेशच उद्धव यांनी दिल्याचे मानले जात आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी बोलावलेल्या आढावा बैठककडे पाठ फिरवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी भाजपला इशारा दिला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट मंगळवारी घेतली. या भेटीत करोना संकटाला तोंड देण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी बुधवारी कोरोना विषयक बैठक तातडीने बोलावली होती. मात्र, या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अनुपस्थित राहिले. दरम्यान, ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना (Shiv Sena) सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) मात्र या बैठकीस उपस्थित राहिले. ठाकरे यांनी या घटनेतून भाजपला सूचक इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलाववलेल्या आढावा बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नव्हे तर महाविकासआघाडी सरकारमधील एकही मंत्री उपस्थित नव्हता. यासोबतच मुख्यमंत्री कार्यालयातील सनदी अधिकारीही या बैठकीस उपस्थित नव्हते. दरम्यान, विधानपरिषद सदस्य झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. मात्र, भाजपचे नेते भेटून गेल्यावर जर राज्यपाल तातडीने बैठक लावत असतील तर मात्र विरोधकांच्या अशा राजकारणार प्रत्युत्तर दिले जाईल, असा संदेशच उद्धव यांनी दिल्याचे मानले जात आहे.
राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीतराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर व प्रदीप व्यास, मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (हेही वाचा, Coronavirus: 'दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी!', राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजप आंदोलनावर टीका)
दरम्यान, कोरोना व्हायरस संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी. कोरोना व्हायरस नियंत्रणासंदर्भात आणि या संकटाविरोधात केल्या जाणाऱ्या उपाययोजना करण्यासाठी एक डॅशबोर्ड तयार करण्यात यावा. या डॅशबोर्डच्या माध्यमातून कोरोना व्हायरस संदर्भात उभारल्या जाणाऱ्या यंत्रणेबाबत एकत्रित माहिती देण्यात यावी, अशा सूचना राज्यापालांनी या बैठकीत केल्या.