मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पंतप्रधानांना लावला फोन, मात्र समोरून मिळाले 'हे' उत्तर

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, ते पश्चिम बंगालच्या निवडणुका संपल्या की संपर्कात येतील असे सांगण्यात आले.

CM and PM (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील आरोग्ययंत्रणा कमी पडत आहे. त्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) फोन केला होता. मात्र समोरून जे उत्तर मिळेल ते थोडेसे अचंबित करणारे होते. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना ऑक्सिजन पुरवठा देण्यासंदर्भात अनेकदा कॉल केले. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, ते पश्चिम बंगालच्या निवडणुका संपल्या की संपर्कात येतील असे सांगण्यात आले.हेदेखील वाचा- महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या, राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

दरम्यान काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या आजाराने ग्रासलेल्या महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये सीएम ठाकरे म्हणाले आहेत की, यावेळी कोरोनाची लाट अत्यंत धोकादायक आहे, अशा परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी दोन्ही सरकारांना एकत्रित अनेक पावले उचलावी लागतील. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेव्हा जनतेशी संवाद साधला होता तेव्हा त्यांनी आपण पंतप्रधानांना असे एक पत्र लिहिणार असल्याचे सांगितले होते. या पत्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.

ताज्या अपडेट्सनुसार, महाराष्ट्रात मागील 24 तासांत कोरोनाचे आणखी 67,123 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 419 जणांचा बळी गेला आहे.