CM Eknath Shinde Guwahati Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांसोबत गुवाहाटी दौऱ्यावर, घेणार कामाख्या देवीचं दर्शन

एकूण आमदारांपैकी काही मंत्री आणि आमदारांनी या दौऱ्याला दांडी मारल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळातही वेगळी चर्चा सुरु आहे. दरम्यान, हे आमदार पूर्वनियोजीत कार्यक्रमामुळे दौऱ्यावर येऊ शकले नसल्याचे समजते.

Eknath Shinde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले 40 आमदार आज पुन्हा एकदा गुवाहाटी (Guwahati) दौऱ्यावर आहेत. एकूण आमदारांपैकी काही मंत्री आणि आमदारांनी या दौऱ्याला दांडी मारल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळातही वेगळी चर्चा सुरु आहे. दरम्यान, हे आमदार पूर्वनियोजीत कार्यक्रमामुळे दौऱ्यावर येऊ शकले नसल्याचे समजते. या दौऱ्यात आमदारांसोबतच काही खासदारांचाही समावेश आहे. हे सर्व आमदार खासदार आणि मुख्यमंत्री हे गुवाहाटी येथे जाऊन कामाख्या देवी मंदिराला भेट देणार आहेत. तेथे ते कामाख्या देवीचे दर्शन घेतील. मुख्यमंत्री आणि आमदारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुवाहाटीमध्ये जोरदार बॅनरबाजी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एका खास विमानाने मुंबई विमानतळावरुन हे आमदार गुवाहाटीसाठी निघणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आमची श्रद्धा आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा गुवाहाटीला निघालो आहोत. तिथे जाऊन आम्ही कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहोत. आम्ही म्हटलं होतं कामख्या देवीला पुन्हा येऊ. आम्ही आता निघालो आहोत. राज्याच्या हितासाठी आम्ही तिथे जाऊन प्रार्थना करणार आहोत. राजयाच्या जनतेमध्ये अमुलाग्र बदल व्हावेत यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. तोच आमचा अजेंडा आहे. आमचा दुसरा काही अजेंडा नसतो. गुवाहाटीला जाण्यासाठी सर्व आमदार सोबत आहेत. ते आमदार आनंदी आहेत,असेही एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी दौऱ्याला जाण्यापूर्वी सांगितले. (हेही वाचा, Maharashtra Politics: महाराष्ट्र सांभाळता आला नाही, बिहार फिरून आले, आदित्य-तेजस्वी भेटीवर भावना गवळी यांची बोचरी टीका)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार पाडून हे नवे सरकार सत्तेत आले आहे. हे सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी शिवसेनेचे सुमारे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सूरतला गेले. त्यानंतर हे सर्व आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. प्रदीर्घ काळा गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये पंचतारांकीत सेवा अनुभवल्यानंतर गोवामार्गे हे आमदार महाराष्ट्रात दाखल झाले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणि सुरक्षेत दाखल झालेल्या या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला आणि हे सरकार सत्तेत आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणा ज्योतिषाकडून भविष्य पाहिल्याची चर्चा असतानाच आता ते गुवाहाटीला निघाले आहेत. तेथे ते कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, गुवाहाटी दौऱ्यात मुख्यमंत्री तेथील मराठी नागरिकांना, अधिकारी आणि व्यवसायिकांना भेटणार असल्याची चर्चा आहे.