Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 365 दिवस साजरी व्हावी- राज ठाकरे

Chhatrapati Shivaji Maharaj Birth Anniversary: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वर्षभर म्हणजेच 365 दिवस साजरी व्हावी, अशी भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

Raj Thackeray | (Photo Credit- X)

छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) आज (17 मार्च) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी व्हावी की, तारखेनुसार? याबाबत प्रदीर्घ काळ वाद रंगला होता. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक्स (जुने ट्विटर) पोस्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली भूमिका व्यक्त केली आहे. 'महाराजांची जयंती ही 365 दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते. पण 365 दिवस साजरी करायची म्हणजे शिवचरित्रातून 365 दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण केलं पाहिजे', असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

'शिवचरित्रातून बोध घेऊन आयुष्यात मार्गक्रमण व्हावे'

राज ठाकरे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती. दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी होते. यावर मध्येमध्ये वाद पण होत असतात. खरंतर महाराजांची जयंती ही 365 दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते. पण 365 दिवस साजरी करायची म्हणजे शिवचरित्रातून 365 दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण केलं पाहिजे.' (हेही वाचा, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन (Watch Video))

'बाहेर वादळ असतं तेंव्हा शांत आत बसून शक्ती साठवून ठेवावी'

मनसे अध्यक्ष आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात की, 'वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पहायचं, त्याची ध्येयधोरण आखायची आणि स्वतःच आर्थिक चलन आणायचं , फार्सी भाषा नाकारून स्वतःचा मराठी शब्दकोश निर्माण करायचा , पुढे एक एक किल्ले जिंकायचे आणि लहान वयातच पीछेहाट पण सहन करायची आणि हे करताना आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांचे मनोधैर्य कुठेही खचू द्यायचे नाही याला एक अद्वितीय प्रतिभाच असली पाहिजे. महाराजांच्या आयुष्यात मधला एक कालखंड असा एक जाणवतो की त्यात फार काही घडत नाही असं वरवर बघणाऱ्याला वाटेल, पण त्याच काळात महाराजांनी खूप पुढची आखणी केली. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे तसं, जेंव्हा बाहेर वादळ असतं तेंव्हा शांत आत बसून शक्ती साठवून ठेवावी आणि जेंव्हा बाहेर शांतता असते तेंव्हा आपलं वादळ निर्माण करावं. महाराजांच्या आयुष्याकडे बघितलं की नेहमी कुतूहल वाटतं की ही समज इतक्या लहान वयात कुठून आली असेल'.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे अद्वितीय प्रतिभा- राज ठाकरे

महाराजांच्या चरित्राचे पारायण करा, नैराश्य येणार नाही

'विद्यमान स्थितीवर भाष्य करत छत्रपतींच्या कार्याचा दाखला देत राज ठाकरे यांनी म्हटले आहे की,आजकाल छोट्या छोट्या पीछेहाटीने किंवा नकाराने नैराश्य येण्याच्या काळात, प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे पारायण केलं तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा महाराजांनी किती शांतपणे स्वराज्य उभं केलं हे जाणवेल, आणि मग असली किरकोळ नैराश्य कधीच येणार नाहीत'.

'माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव आहे, त्यामुळे कधीच नैराश्य, नकारात्मकता मला स्पर्शून पण जात नाही आणि झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावासा वाटत नाही. मला जे योग्य वाटतं ते मी विचारांती बोलतो, आणि हे करताना महाराष्ट्र घडवण्याचं माझं जे ध्येय आहे त्यावरची अगाढ श्रद्धा टिकून राहते हे सगळं शिवचरित्राने मला दिल आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून सदैव मिळत राहू दे हीच इच्छा', अशी भावनाही राज ठाकरे व्यक्त करतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement