Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar: छगन भुजबळ सिल्वर ओकवर दाखल, शरद पवार यांच्या अचानक भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

अचानक झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Chhagan Bhujbal, Sharad Pawar | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी 'सिल्वर ओक'वर (Silver Oak) पोहोचले आहेत. अचानक झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भेटीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक वर्तुळात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे दोन मुद्दे जोरदार चर्चेत आहेत. त्याबरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेली फूट आणि लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल यामुळेही राज्याचे राजकारण वेगवळ्या वळणावर पोहोचले आहे. त्यामुळे ही भेट नेमकी कोणत्या कारणास्तव होत आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

पक्ष प्रवक्त्यांमध्येही संभ्रम

छगन भुजबळ हे नेमके कोणत्या कारणासाठी शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत? याबाबत कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (SS) आणि अजीत पवार यांच्याही पक्षात संभ्रम आहे. शरद पवार हे कोणाबद्दल कधीच कटूता ठेवत नाहीत. आपल्या विचारांशी सहमत नसलेल्या किंवा विरोधात असलेल्या अनेक नेत्यांनाही ते अनेकदा भेटत असतात. ते संवादाचाचा पूल नेहमी कायम ठेवत असतात. त्या दृष्टीकोणातूनच या भेटीकडे पाहायला पाहिजे. त्यामुळे लगेचच त्याचे राजकीय अर्थ काढले जाऊ नयेत, असे शरद पवार यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Chhagan Bhujbal on Ajit Pawar: अजित पवार यांच्यामुळे भाजपला फटका; छगन भुजबळ यांच्याकडून स्फोटक वक्तव्य; सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीवरुनही नाराजी)

सामाजिक चर्चेसाठीही भुजबळ गेले असतील

राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे दोन्ही मुद्दे गाजत आहेत. शरद पवार हे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेले नेते आहेत. अशा वेळी महाराष्ट्रातील सामाजित एकोपा, विकास आणि इतर काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी छगन भुजबळ हे त्यांच्या भेटीला गेले असावेत. लोकशाहीमध्ये चर्चा व्हायला हवी. ती होत असते. यात नवे काही नाही. त्यामुळे ती होत असेल तर कोणी त्याचा वेगळा अर्थ काढण्याची शक्यता नाही. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या कारणास्तव भेट झाली हे छगन भुजबळ यांनी सांगितल्यानंतरच कळणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Vidhan Sabha Election: लोकसभा झाली आता विधानसभेची तयारी; महाविकासाघाडीमध्ये जागावाटपावरुन स्पर्धा; कोणाला किती जागा?)

दरम्यान, भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यातील भेटीस मराठा आणि ओबीसी आरक्षण या प्रश्नांचा संबंध जोडत प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण मुद्द्यावर बोलावलेल्या बैठकीस विरोधकांनी ऐणवेळी दांडी मारली. त्यामुळे शरद पवार यांनी या मुद्द्यावर सर्वांचे एकमत घडवून आणावे यासाठीही ही भेट झाली असावी, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.