'घुसखोरांना हाकलण्याचा कार्यक्रम आजचा नाही, तो 20 वर्षांपूर्वीचा आहे' राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

Raj Thackeray, Chhagan Bhujbal (Photo Credit: IANS)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sena) आज बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत (Mumbai)मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यातच अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनसेच्या नव्या भुमिकेवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या मोर्चामागे कोणीही असले तरी काही फरक पडत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. याशिवाय बांगलादेश किंवा पाकिस्तानच्या घुसखोरांना हाकलण्याचा कार्यक्रम आजचा नाही, तो 20 वर्षांपूर्वीचा आहे, असा दावाही छगन भुजबळ यांनी केला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच 23 जानेवारी रोजी पक्षाच्या झेंड्यासह आपल्या विचारधारेतही मोठा बदल केला आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात आवाज उठवला आहे. या पाश्वभूमीवर मनसेचा आज 9 मार्च रोजी मोर्चा निघाला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. लोकशाहीमध्ये आपले मत मांडण्याचा आणि मोर्चा काढण्याचा सगळ्यांना हक्क आहे. मुंबईतील आजच्या मोर्चामागे कुणीही असले तरी काही फरक पडत नाही. लोकशाहीमध्ये सगळ्यांना इकडून तिकडे, तिकडून इकडे जाण्याचा अधिकार आहे. पण आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. घुसखोरांच्या ट्रेन भरल्या जातात. लोकांना तिकडे उतरवतात. परत ते तिकडून बसतात आणि इकडे येतात. याच्यावर मार्ग काढण्यासाठी भारत सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनीही मनसेच्या मोर्चावर आपली प्रतिक्रिया दिली आहेत. मनसेच्या मोर्चाने शिवसेनेवर कोणताही फरक पडणार नाही. आम्ही येथे महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आलो आहोत. तसेच महाराष्ट्राचा विकास आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे, असे शिवसेना आमदार दिलीप लांड म्हणाले आहेत. तर शिवसेनेचे नेते संजय शिरसा यांनी शिवसेना ही सुरूवातीपासून हिदुत्वाच्या मुद्द्यावर लढत आली आहे आणि यापुढे लढणार, असे ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला प्रचंड गर्दी; मुंबई येथील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते दाखल

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आज मनसेचा मोर्चा निघाला होता. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी ठाणे, पालघर, पुणे, नाशिकसह राज्यभरातील मनसैनिक सहभागी झाले होते. राज ठाकरेंच्या सभेसाठी मुंबईतील आझाद मैदानात भव्य स्टेज उभारण्यात आला असून दोन लाख जणांसाठी आसनव्यवस्था असल्याचाही दावा केला जात आहे.