महाविकाआघाडी: छगन भुजबळ यांच्या खुर्चीत अशोक चव्हाण बसले; मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत वादाला तोंड फुटले
विजय वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन खात्याची जबाबदारी आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज खुर्चीनाट्य रंगले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यात हा वाद पाहायला मिळाला. मंत्रिमंडळ बैठकी वेळी अशोक चव्हाण हे छगन भुजबळ यांच्या खुर्चीत बसले त्यामुळे हा वाद सुरु झाल्याचे वृत्त प्रसारमध्यमांनी दिले आहे.
मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झाल्यानंतर महाविकासआघाडी सरकारचे खातेवाटप नुकतेच पार पडले. हे खातेवाटप झाल्यानंतर महाविकासआघाडी सरकारची ही पहिलीच मंत्रीमंडळ बैठक होती. नेहमीप्रमाणे या बैठकीस आसनव्यवस्था करण्यात आली होती. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्रिमंडळ बैठकीवेळी अशोक चव्हाण हे भुजबळ यांच्या खुर्चीत बसले. यावरुन भुजबळ संतापले आणि या दोन मंत्र्यामंध्ये वादावादी झाली. (हेही वाचा, मुंबई: 'फ्री कश्मीर' पोस्टरवरुन जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यात ट्विटवॉर)
दरम्यान, पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीस कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चां रंगल्या. विजय वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन खात्याची जबाबदारी आहे. खातेवाटपात मनासारखे खाते वाट्याला आले नसल्याने वडेट्टीवार नाराज असल्याचे समजते.