जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी यासीन भटकळ वर आरोप निश्चित

आज, सोमवारी ही सुनावणी पार पडली. याबाबत पुढील सुनावणी 15 मे रोजी होणार आहे.

यासीन भटकळ (Photo Credit : Youtube)

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत (German Bakery) 13 फेब्रुवारी 2010 रोजी सायंकाळी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 17 जणांचा मृत्यु झाला होता, तर 56 जण जखमी झाले होते़. या स्फोटातील मुख्य आरोपी यासीन भटकळ (Yasin Bhatkal) ऊर्फ शिवानंद याच्यावर पुण्यातील विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आहे़. आज, सोमवारी ही सुनावणी पार पडली. याबाबत पुढील सुनावणी 15 मे रोजी होणार आहे. भटकळ हा कुख्यात दहशतवादी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा (Indian Mujahideen) संस्थापक आहे.

बॉम्बस्फोटानंतर भटकळ फरार होता, त्याला 2014 साली नेपाळ इथे अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर खटला चालविण्यात आला. न्यायालयातील याबाबत 80 हून अधिक सुनावण्या पार पडल्या, मात्र सुरक्षेच्या कारणामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते. आज त्याला विशेष न्यायाधीश के. डी.वडणे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावरील सर्व आरोप निश्चित झाले असून, याबाबत 15 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. (हेही वाचा: पुण्यावर झालेले आघात; आजही ताज्या आहेत त्या जखमा, ज्याने शहराचा चेहरामोहराच बदलला)

दरम्यान, भटकळ आणि त्याचा साथीदार यांच्यावर पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, सुरत, वाराणसी या शहरांमध्ये झालेल्या बाँबस्फोटांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. जर्मन बेकरी प्रकरणात मिर्झा हिमायत इनायत बेग याला 7 सप्टेंबर 2010 रोजी अटक केली होती़. उच्च न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यात यासीन भटकळ हा मुख्य आरोपी आहे़. त्यानेच जर्मन बेकरीत एक बॅगमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़. याचसोबत त्याच्यावर देशद्रोह, खून, बनवत कागदपत्रे बनवणे असे विविध आरोप आहेत.