संभाजी भिडे यांना ISRO च्या प्रमुख पदी नेमणूक करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून विनवणी

चांद्रयान 2 (Chandrayaan 2) या मोहिमेसाठी संभाजी भिडे यांना चक्क ISROच्या प्रमुख पदी नेमणुक करावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्राद्वारे विनवणी करण्यात आली आहे.

संभाजी भिडे (Photo Credits-Twitter)

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी काही दिवसांपूर्वी इस्रोच्या चांद्रयान 2 वरुन अजब वक्तव्य केले होते. त्यावेळी ब्रह्मांडातील नक्षत्रांची स्थिती एकादशीला संतुलित असते. अमेरिकेने (America) एकादशीच्या दिवशी त्यांचे यान अंतराळात सोडल्याने त्यांची मोहीम यशस्वी झाली असल्याचे संभाजी भिडे यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे संभाजी भिडे यांची खिल्ली सुद्धा उडवण्यात आली.

परंतु आता चांद्रयान 2 (Chandrayaan 2) या मोहिमेसाठी संभाजी भिडे यांना चक्क ISROच्या प्रमुख पदी नेमणुक करावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्राद्वारे विनवणी करण्यात आली आहे. मोदी यांना लिहिलेल्या पत्रात प्रेक्षित तळोकर यांनी पत्राच्या सुरुवातीला ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पुणे शहर सरचिटणीस पदी काम करत असल्याचे म्हटले आहे. तर पुढे त्यांनी सांगली मधील भिडे गुरुजी यांना इस्रोच्या प्रमुख पदी तत्काळ नेमणूक करावी असे ही म्हटले आहे.(एकादशीला यान लाँच केल्याने अमेरिकेची अंतराळ मोहीम यशस्वी; संभाजी भिडे यांचा अजब दावा)

तसेच श्रीहरिकोटा मधील सगळी सूत्र भिडे यांच्या हाती दिल्यास ते पंचांग पाहून पुढील कार्यक्रम ठरवतील. असे झाल्यास थोड्याच दिवसात भारताची इस्रो ही संस्था अमेरिकेच्या NASA संस्थेपेक्षा अव्वल ठरेल असा ही दावा पत्रातून करण्यात आला आहे. त्यामुळे मोदी यांनी या पत्रातील मुद्द्याचा विचार करावा अशी विनंती ही करण्यात आली आहे.