Sanjay Raut On Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांची किंमत 1.25 रुपये; संजय राऊत ठोकणार अब्रूनुकसानीचा दावा
संजय राऊत हे त्यांच्यावर केलेल्या आरोपावरुन चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहेत.
भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील आरोप प्रत्यारोप आता कोर्टाची पायरी चढणार आहेत. संजय राऊत हे त्यांच्यावर केलेल्या आरोपावरुन चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहेत. शिवसेना मुखपत्र म्हणून ओळकल्या जाणाऱ्या दै. सामना (Dainik Saamana) संपादकीयातून संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी दै. सामनाला पत्र पाठवून प्रत्युत्तर दिले होते. या पत्रात पाटील यांनी राऊत यांच्यावर टीका करताना विविध आरोप केले होते. या आरोपावरुन राऊत हे पाटील यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत. भाजपाच्या लोकांनी ईडीसारख्या संस्थांना बदनाम केलंय. ईडीचे यांच्या घरी भांडी घासायला येते का, असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला.
संजय राऊत यांनी खासगी वृत्तवाहिनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, आम्ही कोणत्याही आरोपांना भीक घालत नाही. आम्ही मध्यमवर्गीय नोकरादर लोक आहोत. भ्रष्टाचार करणे, बेकायदेशीर माया, पैसा गोळा करणे हे आम्हाला जमत नाही. आम्ही गेली अनेक वर्षे राजकारणात आहोत. आम्ही गैरमार्गाने काही करत बसलो असतो तर राजकारणात टिकलो नसतो. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये चंद्रकांत पाटील यांना आपली कायदेशीर नोटीस जाईल. अनेक लोक शंभर कोटी, दीडशे कोटी रुपयांचा दावा दाखल करतात. मी चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयांचा दावा दाखल करणार आहे. त्यांची किंमत सव्वा रुपया येवढीच आहे, असेही संजय राऊत म्हणाले. राऊत यांच्या भूमिकेवर चंद्रकांत पाटील हे काय प्रत्युत्तर देतात याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Chandrakant Patil on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या अग्रलेखाला, चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर, दै. सामनाने छापले पत्र)
काय आहे प्रकरण?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर विविध आरोप केले. या आरोपांवरुन शिवसेना मुखपत्र दै. सामना संपादकीयामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून चंद्रकांत पाटील यांनी दै. सामनाला एक पत्र लिहिले. या पत्रात चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांच्यावर आरोप केले. या आरोपावर संजय राऊत यांनी न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे.