कोरोना व्हायरस चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मध्य रेल्वेचा पुढाकार, 'अशा' पद्धतीने झाली संपूर्ण यंत्रणा सज्ज

या आजाराचा सामना करण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक जारी केलं असून माहिती दिली आहे. कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी मध्य रेल्वेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.

Representative image (Photo Credits: Wikimedia Commons/IANS)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महाराष्ट्रात पसरू नये यासाठी सर्व शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या असून यात मध्य रेल्वेनेही (Central Railway) पुढाकार घेतला आहे. लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेने आपल्या परीने नवनवीन उपक्रम सुरु केले आहेत. गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर काही महत्त्वाच्या सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. या आजाराचा सामना करण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक जारी केलं असून माहिती दिली आहे. कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी मध्य रेल्वेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.

रेल्वे स्थानकांवर जास्तीत जास्त प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे अशा ठिकाणी कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेच्या सर्व स्तरांवर या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. यासाठी नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि कर्मचार्‍यांना या विषयाबद्दल संवेदनशील आणि शिक्षित केले गेले आहे.

मध्य रेल्वेच्या कोरोना विरुद्धच्या उपाययोजना:

1. भायखळा, कल्याण, भुसावळ, सोलापूर, नागपूर आणि पुणे येथील रेल्वे रुग्णालयांना कोरोना विषाणूच्या संशयास्पद घटनांचा उपचार करण्यासाठी आवश्यक आणि संरक्षणात्मक उपकरणे उपलब्ध करुन देण्यासाठी वेगळे वॉर्ड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

2. रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये पोस्टर्स आणि पत्रकेद्वारे कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. याशिवाय जनजागृती करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप्स दाखविल्या जात आहेत. Coronavirus बाबत जनजागृती करण्यासाठी अमिताभ बच्चन यांंची खास भोजपुरी कविता (Watch Video)

3. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर तसेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारेही याबाबतीत जनजागृती केली जात आहे.

4. वैद्यकीय कर्मचार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, कोरोना आजाराचा कोणताही संशयित रुग्ण आढळल्यास अथवा नोंदवले गेल्यास तातडीने रेल्वे रुग्णालय किंवा आरोग्य युनिटमध्ये तसेच त्या बाबतीत रेल्वे बोर्ड आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे.

त्याचबरोबर प्रत्येक रेल्वे स्थानकांवरील स्टेशन कर्मचार्‍यांना तातडीने आवश्यक कारवाईसाठी कोरोना व्हायरस (कोविड -१९) विषयी जागरुक केले गेले आहे. मध्य रेल्वेच्या या उपक्रमाला नागरिकांनी हातभार लावून मध्य रेल्वेला सहकार्य करावे असे प्रवाशांना सांगण्यात येत आहे.